You are currently viewing आणीबाणीच्या काळात महसूल कर्मचारी नेहमीच आघाडीवर –  जिल्हाधिकारीके मंजूलक्ष्मी

आणीबाणीच्या काळात महसूल कर्मचारी नेहमीच आघाडीवर –  जिल्हाधिकारीके मंजूलक्ष्मी

महसूल दिनानिमित्त 40 कर्मचाऱ्यांचा गौरव

सिंधुदुर्गनगरी

पूरस्थिती असो, वादळ असो की कोव्हिडचा काळ असो अशा आणीबाणीच्या प्रसंगी महसूल कर्मचारीच नेहमी आघाडीवर असतात याचा मला सार्थ अभिमान आहे, असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी काढले.

            नविन जिल्हा नियोजन समिती सभागृहात महसूल दिनानिमित्त आयोजित गौरव सोहळ्यात त्या बोलत होत्या. यावेळी 40 महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन रवींद्र मठपती, भूसंपादन अधिकारी वर्षा शिंगण, उप जिल्हाधिकारी उपेंद्र तामोरे व्यासपीठावर उपस्थित होते.

            या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्यासह आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाले. यावेळी 40 महसूल कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह आणि गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला.

उपविभागीय अधिकारी म्हणून कुडाळच्या प्रांत वंदना खरमाळे, तहसीलदार म्हणून कुडाळचे तहसीलदार अमोल पाठक, देवगड तहसिलदार ए. एन. कांबळे, दोडामार्ग तहसीलदार अरुण खानोलकर यांच्यासह पोलीस पाटील, कोतवाल, शिपाई, वाहन चालक,तलाठी, महसूल सहाय्यक, मंडळ अधिकारी, अव्वल कारकून, लघुलेखक, नायब तहसिलदार  अशा विविध संवर्गातील 40 जणांना यावेळी गौरविण्यात आले. पुरस्कार विजेत्यांच्या वतीने वंदना खरमाळे, अमोल पाठक, भरत नेरकर, एम आर नाईक यांनी मनोगत व्यक्त करताना सहकाऱ्यांच्या प्रयत्नामुळे हा गौरव होत असल्याचे सांगितले.

            यावेळी बोलताना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी पुढे म्हणाल्या की प्रत्येक महसूल कर्मचाऱ्यांने काम करतेवेळी आपल्या आरोग्याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. यासाठी आज आरोग्य शिबीराचे देखील आयोजन करण्यात आले होते. 47 कर्मचाऱ्यांनी त्याचा लाभ घेतल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिली.

            यावेळी वर्षा शिंगण, उपेंद्र तमोरे, रवींद्र मठपती यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी श्री. भडकवाड यांनी केले. महसूल विभागाने केलेल्या वर्षभरातील कामाची माहिती दिली. 16 लाख 32 हजार 7/12 पैकी 16 लाख 28 हजार  7/12 चे संगणकीकरण करण्यात आल्याचे श्री. भडकवाड यांनी सांगितले. यावेळी सावंतवाडीचे प्रांत अधिकारी प्रशांत पानवेकर, कुडाळच्या प्रांताधिकारी वंदना खरमाळे, कणकवलीच्या वैशाली राजमाने आणि महसूल अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजश्री सामंत यांनी तर आभार प्रदर्शन महसूल तहसीलदार श्रीधर पाटील यांनी केले. यावेळी महसूल कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा