कट्टर शिवसैनिकांनी व्यक्त केली संवाद मीडियाकडे खंत
महाराष्ट्रातील शिवसेना पक्षात फूट पडली असून उद्धव ठाकरे गट व शिवसेना शिंदेगट असे दोन वेगवेगळे गट निर्माण झाले असून “आम्हीच खरी शिवसेना” असे दोन्ही गटाकडून सांगण्यात येत आहे. शिवसेना कोणाची? असा वाद देखील कोर्टात गेला आहे. महाराष्ट्रातील बाळासाहेब ठाकरे यांनी उभी केलेली शिवसेना पुन्हा जोमाने उभी राहण्यासाठी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कंबर कसली आहे. युवासेना प्रमुख माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे महाराष्ट्र राज्यातील जिल्ह्या जिल्ह्यात जाऊन शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने चौका चौकात शिवसैनिकांची संवाद साधत आहेत. गेली दोन अडीच वर्षे शिवसेना नेतृत्वाकडून महाराष्ट्रात दौरे होताना अभावाने दिसून येत होते, परंतु महाराष्ट्रातील सत्तेतून उद्धव ठाकरे गट पायउतार होताच, उद्धव ठाकरे आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रात दौरे आयोजित करून शिवसंवाद यात्रा सुरू करून शिवसैनिकांची संवाद साधत आहेत.
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे कोकण दौऱ्यावर येत असून कोकण दौऱ्यातील पहिली सभा शिंदे गटातील मुख्य प्रवक्ते असलेले सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी मतदारसंघात होत असून त्या सभेच्या पार्श्वभूमीवर मालवण कुडाळ मतदार संघाचे आमदार आणि उद्धव ठाकरे यांचे कट्टर समर्थक वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, आदींनी सावंतवाडी मध्यवर्ती कार्यालयात शिवसंवाद यात्रेच्या पार्श्वभूमीवर भेट दिली होती. यादरम्यान सावंतवाडीतील शिवसैनिकांनी देखील शिवसेना सावंतवाडी मध्यवर्ती कार्यालयात गर्दी केली होती. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ घोषणा देत शक्तीप्रदर्शन केले. यावेळी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी तालुक्यातील इतर शिवसैनिकांना याची कल्पना न दिल्याने कवठणी येथील कट्टर शिवसैनिक सुधा कवठणकर यांनी आम्ही कट्टर शिवसैनिकच….आम्हाला का बोलावले नाही?* असा प्रश्न उपस्थित करून संवाद मीडियाकडे खंत व्यक्त करत तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर कट्टर शिवसैनिक असणाऱ्या सर्वांना एकत्र करून पुन्हा एकदा शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली वाढविण्याची किमया तालुकाप्रमुखांना करावी लागणार आहे. अशावेळी सावंतवाडी तालुक्यातील कट्टर शिवसैनिकांना नाराज करणे तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांच्यासाठी धोक्याचे ठरू शकते.