You are currently viewing मालवणच्या नारळी पौर्णिमेला महिलांसाठी “सुवर्णयोग” ; विशेष प्राविण्य म्हणून मिळणार ९ ग्रॅम सोन्याचा हार ..!

मालवणच्या नारळी पौर्णिमेला महिलांसाठी “सुवर्णयोग” ; विशेष प्राविण्य म्हणून मिळणार ९ ग्रॅम सोन्याचा हार ..!

महिलांच्या नारळ लढवण्याच्या स्पर्धेत सोन्याची नथ, पैठणी, चांदीचा हार, कंबरपट्टा, मोबाईल अशा बक्षिसांची उधळण

मालवणी वारसा आणि संस्कृती मंडळाचे आयोजन ; अध्यक्ष अरविंद मोंडकर यांनी केली घोषणा

मालवण

मालवणची ऐतिहासिक नारळी पौर्णिमा ११ ऑगस्टला सायंकाळी ४ वाजता बंदर जेटी येथे संपन्न होत आहे. यंदाची नारळी पौर्णिमा महिलांसाठी “सुवर्णयोग” घडवून आणणारी असून मालवणी संस्कृती आणि वारसा मंडळाच्या वतीने महिलांच्या नारळ लढवण्याचा स्पर्धेनिमित्ताने सोन्या- चांदीच्या बक्षिसांची उधळण करण्यात येणार आहे. स्पर्धेतील विजेत्या महिलेला सोन्याची नथ आणि पैठणी दिली जाणार असून विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या स्पर्धकाला ९ ग्रॅम सोन्याचा हार मिळणार आहे. याशिवाय अन्य विजेत्या स्पर्धकांवर चांदीचा हार, चांदीचा कंबरपट्टा, मोबाईल अशा बक्षिसांची उधळण करण्यात येणार आहे. याबाबतची घोषणा संस्थेचे अध्यक्ष अरविंद मोंडकर यांनी पत्रकार परिषदेत केली.

मालवण मेढा येथील आर्यन होम स्टे मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत श्री. मोंडकर यांनी ही माहिती दिली. यावेळी गणेश पाडगावकर, विद्या फर्नांडिस, देवानंद लुडबे, ममता तळगावकर, कल्पना मेथर,
गीता नेवाळे, योगेश्वर कुर्ले, सल्लागार ऍड. अमृता अरविंद मोंडकर, शुभदा पाडगावकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

सोन्या- चांदीच्या ऐवजांसह अन्य बक्षिसांची उधळण…

स्पर्धेत विशेष प्राविण्य म्हणून आकर्षक असा ९ ग्रॅम सोन्याचा हार (नेकलेस) जिंकण्याची संधी देण्यात येणार आहे. त्याशिवाय स्पर्धेमधील प्रथम क्रमांकांस
पैठणी, सोन्याची नथ सोबत १० लाखाचा विमा, द्वितीय क्रमांकास पैठणी व चांदीची पैंजण सोबत १० लाखाचा विमा, तृतीय क्रमांकासाठी पैठणी व चांदीची पैंजण सोबत १० लाखाचा विमा आणि चतुर्थ क्रमांकासाठी पैठणी, मोबाईल सोबत १० लाखाचा विमा अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. सहभागा बद्दल लकी ड्रॉ द्वारे देखील हक्काचे बक्षीस म्हणून चांदीचा कंबरपट्टा ठेवण्यात आला आहे.

यावेळी श्री. मोंडकर म्हणाले, दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील नारळी पौर्णिमा निमित्ताने महिलांसाठी नारळ लढवणे स्पर्धा घेण्यात येणार आहे. यावेळी महिलांना पैठणी सोबत सोन्या, चांदीची बक्षिसे जिंकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेच्या वतीने २०१६ पासून या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. कोरोना कालावधी मध्ये मंडळाच्या वतीने सतत दोन वर्षे सातत्याने या सणाचं वैशिष्ट्य जपत मास्क वाटप करण्यात आले. मात्र आता कोरोनाचा प्रसार कमी झाल्याने यंदा पुन्हा एकदा मालवण बंदर जेटी येथे मालवण तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिलांसाठी नारळ लढवण्याची स्पर्धा घेण्यात येत आहे. या स्पर्धेस पाहूणे म्हणून विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

स्पर्धेसाठी नारळ आयोजकांकडून मोफत मिळणार आहेत. या कार्यक्रमात सहभाग घेणाऱ्या स्पर्धकांच्या व स्पर्धा पाहणाऱ्या उपस्थित नागरिकांसाठी कुपन देण्यात येणार असून यातुन एक कुपन लकी ड्रॉ पद्धतीने काढण्यात येईल. त्या विजेत्यास आकर्षक बक्षीस म्हणून चांदीचा कंबरपट्टा देण्यात येणार आहे. स्पर्धेत विशेष प्राविण्य म्हणून सोन्याचा हार जिंकण्याबाबत असलेल्या अटी शर्ती स्पर्धेदरम्यान सांगण्यात येणार आहेत. स्पर्धेत नावनोंदणी याच दिवशी दुपारी ३ ते ४ या वेळेत होईल. तत्पुर्वी नाव नोंदवण्याकरता अरविंद मोंडकर ९८९२०५५८२०, गणेश पाडगावकर ९४२३२१४७४५, विद्या फर्नांडिस ७७६७०५३३६४, स्नेहल मेथर
९७०२६०४७२० यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा