सिंधुदुर्ग जिल्ह्यात अलीकडे लॉक डाऊन काळापासून अवैद्य धंदे जोरात सुरू झाले आहेत. कामधंदे नसलेली तरुण मुले आपल्या चैनी साठी अवैद्य धंद्यांकडे वळली आहेत. महागडे मोबाईल आणि पॉश राहणीमान यामुळे तरुण मुलांना आपले शौक पूर्ण करण्यासाठी घरातून पैसे मिळत नाहीत. अशावेळी बक्कळ पैसा मिळविण्यासाठी ही तरुण मुले दारू, मटका, जुगार, चोरी अशा अवैद्य धंद्यांमध्ये गुंतली आहेत.
सावंतवाडी पोलिसांनी अलीकडील काही दिवसांमध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी करत कोणतेही धागेदोरे नसताना मळगाव येथील विवाहिता गीतांजली मळगावकर हिच्या खुनाला वाचा फोडत तिचे खुनी अवघ्या काहीच दिवसात गजाआड केले. शशिकांत खोत त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित गोते, तौफिक सय्यद आणि सहकाऱ्यांच्या मदतीने यशस्वी तपास करत संशयित आरोपींना अटक करून पुढील तपास करत आहेत.
मृत महिलेच्या खुनाच्या तपासाचे प्रकरण ताजे असतानाच माजगाव येथे घरफोडी करून किमती साहित्य व लॅपटॉप चोरी केल्या प्रकरणी पोलिसांनी त्याच परिसरात राहणाऱ्या चोरट्याला संवाद कौशल्य वापरून अवघ्या तब्बल दोन तासात मोठ्या शिताफीने अटक केले.
माजगाव येथील रोहन माजगावकर यांच्या घरी काल चोरी झाल्याची तक्रार त्यांनी रात्री साडे सात वाजता सावंतवाडी पोलीस स्टेशनमध्ये दिली होती. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक गोते, पाटील यांच्यासहित सहकारी शरद लोहकरे, नवनाथ शिंदे, कांदळकर, नाईक, मातोंडकर आदींनी संवाद कौशल्य पणास लावून सापळा रचून संशयित अरबाज शहा (वय १८) याला माजगाव परिसरात फिरत असतानाच ताब्यात घेतले. संशयिताने आपण चोरी केल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी सावंतवाडी पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांनी मार्गदर्शन केले. या चोरीच्या गुन्ह्यात संशयित आरोपी सोबत आणखी साथीदार असण्याची शक्यता असून त्याचा तपास सुरू आहे.
लॉकडाऊनच्या काळात उपनिरीक्षक स्वाती यादव यांनी परिस्थिती उत्तमरीत्या हाताळली होती, आणि गेल्या महिन्याभरात सावंतवाडी पोलिसांनी पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडीत घडणाऱ्या गुन्ह्यांचा तपास वेगवान करत सावंतवाडी पोलीस स्टेशनची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सावंतवाडी पोलिसांची सद्ध्या होत असलेली कामगिरी सिंधुदुर्गवासीयांसाठी सुद्धा अभिमानास्पद आहे. पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांचा वाटा यात महत्वाचा आहे. त्यांच्या योग्य मार्गदर्शनाखाली सावंतवाडी पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी सर्वोत्तम कामगिरी करत आहेत.