*”मेघनुश्री” या टोपण नावाने लिहिणाऱ्या लेखिका कवयित्री मेघा कुलकर्णी लिखित दीप अमावस्येच्या निमित्ताने लिहिलेला अप्रतिम लेख*
*दीपपूजा*
आषाढ महिना आणि कोसळणारा पाऊस यांचे एक वेगळेच समीकरण नेहमीच दिसून येते. भक्तिरसांत न्हाऊन निघणारी आषाढी एकादशी आणि पंढरपूरची यात्रा, महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे. संत विचारांशी एकरूप असलेली ही वारी साधेपणाचे दर्शन घडविते. जीवनांतील पहिले गुरू पालक आणि शैक्षणिक प्रवासांतील मार्गदर्शक यांचे महत्व सांगणारी गुरुपोर्णिमा सुविचार देऊन जाते. यानंतर येते ती आषाढमासी आमावस्या या दिवसाचे एक खूपच वेगळे महत्व आहे. या दिवशी सर्व दिव्यांचे पूजन करण्याची प्रथा आहे. ज्यादिवशी चंद्रदर्शन होत नाही तो आमावस्येचा दिवस चांगले काम, चांगली सुरवांत करण्यासाठी नाकारला जाते. कोणत्याही विचारांना विरोध नाही. प्रत्येकाच्या मनांतील कल्पना, संकल्पना वेगळी असते.
दिवा, प्रकाश, ज्योत ही सकारात्मकता या दीपपूजेच्या निमित्ताने प्रकटते. देवासमोर लावली जाणारी समई संध्याकाळ प्रसन्न करते. हा क्षण नुसते देवघर उजळत नाही तर अंतरंगात उमेद निर्माण करतो. दिवसभरांतील धावपळीला काही मिनिटांची विश्रांती मिळते. नियमित म्हटली जाणारी सायंस्तोत्रे, घरांत आणि तुळशीपुढे उजळलेला दीप त्यांत असलेली वांत सहिष्णुता शिकवत रहाते. अगरबत्ती, धूपाचा दरवळ घरकुलांस सुगंधीत करतो. औक्षणाचा दिवा आशीर्वादाचे महत्व सांगतो. गल्लोगल्ली असणारे दिवे, हमरस्त्यावरील दिवे, मंदिराच्या कळसावरील दिवा अशा सर्व प्रकारांनी आपल्या झगमगाटाने मानवी डोळ्यांचे पारणे फेडत असतात. चंद्रप्रकाश हा खरे तर सर्वांत सुखावणारा नैसर्गिक आनंद आणि तो ज्या दिवशी पूर्णत: गायब होतो तो दिवस आमावस्या.
जसे सगळे दिवस सारखे नसतात असे एकंदरीत म्हटले जाते तसेच हे नैसर्गिक चक्र आहे, पण काळ्याकभिन्न अंधाराला, वाईट आठवणींना घाबरले जाते तसेच आमावस्या या तिथीबद्दल आहे. काही ठिकाणी या तिथीला ‘गटारी आमावस्या’ असेही म्हटले जाते. पुढे सणांची सुरवांत होत असल्याने श्रावण, भाद्रपद पूर्णपणे शाकाहारी भोजनाचा स्विकार मनापासून केला जातो, पाळला जातो. मध्ये एका कार्यक्रमांत एक डॉक्टर मुख्य अतिथी म्हणून लाभले, त्यांनी आपला त्या गावांतील अनुभव व्यासपीठावरून सांगितला. त्यांचे म्हणणे असे की, इतर दिवशी पेशंट बऱ्यापैकी असतात पण मी आमावस्येदिवशी पूर्णपणे रिकामा बसून असतो. त्यादिवशी कुणीही दवाखान्याकडे फिरकत नाहीत, या वक्तव्यावर सभागृहांत प्रचंड हशा पिकला.
आमावस्या या तिथीचे शुभरूप लेखनांतून साकारावे असे मनाशी ठरवून या सणाच्या काव्यशुभेच्छा ‘दीपदेवी’ मधून देत आहे.
समईतली वात शिकवते सहिष्णुता,
उजळते देवघर अंतरंगांत प्रसन्नता ||१||
सुसंस्कार प्रतिक ‘शुभंकरोती’ स्वरांत,
लक्ष्मीचा आशिर्वाद संध्यासमयी घरांत ||२||
लखलखते दिवे प्रगतशील जीवनांत,
समई अखंड तेवते मंदिरांच्या गाभाऱ्यांत ||३||
आषाढमासी आमावस्या दीपदेवीच्या पूजनांत,
महती दिव्यत्वाची येथे मंगलसणांची सुरवांत ||४||
मेघनुश्री, कोल्हापूर
मोबाईल : ७३८७७८७५१२
ईमेल – megha.kolatkar 21@gmail.com