*शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करू नका*
*संपर्कप्रमुख शैलेश परब यांचा इशारा*
सावंतवाडी :
शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारण्याचा बंडखोर आमदार दीपक केसरकर यांना नैतिक अधिकार नाही. कोरोना काळात आपल्या मतदारसंघाला वाऱ्यावर सोडून आजारी असल्याचे नाटक करून केसरकरांनी मतदारांची प्रतारणा केली आहे. केवळ कोट्यावधी निधी आणण्याचा धिंडोरा पिटणाऱ्या याच आमदारांनी आतापर्यंत मतदारसंघात एक तरी काम दाखवावे, ज्यामधून १०० जणांना रोजगार मिळाला आहे. त्यामुळे नाहक त्यांनी शिवसेना आणि पक्षप्रमुखां वर टीका करून स्वतःच्या गद्दारीचे प्रदर्शन करू नका, असा रोखठोक इशारा शिवसेना सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख शैलेश परब यांनी दिला आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख शैलेश परब यांनी पक्षप्र मुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसा च्या पूर्वसंध्येला पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केसरकर यांना थेट इशारा दिला. आतापर्यंत केवळ आ. केसरकर यांचे वय पाहून आम्ही गप्प होतो, मात्र त्यांनी थेट आमचे पक्षप्रमुख आणि मातोश्रीवर वक्तव्य करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांना यापुढे ‘जशास तसे उत्तर मिळेल, असे परब यांनी ठणकावले. स्वतःला शिवसेनेचा आहे, असे म्हणणाऱ्या केसरकर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका करणार नसल्याचे सांगितले होते. मात्र तरीही ते स्वतः आणि अन्य बंडखोर आमदार नाहक टीका करत आहेत. ही टीका शिवसैनिक खपवून घेणार नाहीत, असा इशारा परब यांनी दिला आहे. बंडखोर आमदार केसरकर यांनी वेळोवेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांच्या दोन मुलांना अजूनही सुधरा, असे आवाहन केले होते. आता मात्र त्याच केसरकरांनी भारतीय जनता पार्टीसोबत सत्ता स्थापन केली. त्यामुळे केसरकर यांनी केलेल्या आवाहनाप्रमाणे राणे कुटुंबीय सुधारले आहेत असे म्हणायचे काय ? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात काम करण्याची इच्छा केसरकर यांनी व्यक्त केली. तेथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मांडीला मांडी लावत असताना, त्यांनी केलेले सर्व आरोप यांचा राजकीय दहशतवाद आता संपला आहे काय ? असा सवालसुद्धा परब यांनी उपस्थित केला. इतकेच नव्हे तर वेळोवेळी सिंधुदुर्गात आपण राजकीय संघर्ष केला, कोकणात आपण दहशतवाद संपवला, हा दहशतवाद नेमका कुणाचा ? हा दहशतवाद राणे यांचा होता का आणि आता तो संपला आहे का ? या प्रश्नांची उत्तरे केसरकर यांनी जनतेला द्यावीत. तुम्ही कितीही प्रयत्न करा परंतु हे पाच शब्द एकमेकांपासून तुम्ही कधी अलग करू शकणार नाही. त्यामध्ये ठाकरे कुटुंबीय , शिवसेना, मातोश्री, सेना भवन आणि शिवसैनिक असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. केसरकर यांनी जिल्ह्यात आणि आपल्या मतदारसंघात कोणता विकास केला ? सावंतवाडी येथील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हे केसरकर यांच्यामुळे गेले दोन वर्षे रखडले आहे. वेत्ये येथे जागा उपलब्ध असताना केसरकर यांनी जी जागा सरकारच्या नावे नसताना या जागेवर भूमिपूजन केले. केसरकर यांनी घोषित केलेल्या एक लाख सेट टॉप बॉक्सचे पुढे काय झाले ? जिमखाना मैदानावर शेकडो बेरोजगारांचे नोकरीसाठी फॉर्म भरून घेतले, चष्म्याचा कारखाना कुठे राहिला ? आंबोली येथील गोल्फ कोर्सचे काय झाले ? चांदा ते बांदा योजनेतून आलेला ३०० कोटी रुपयांचा निधीपैकी किती निधी खर्च केला ? अम्युजमेंट पार्क, फूड पार्क, फिशर मेन व्हिलेज, वृंदावनच्या धरतीवर तिलारी येथे गार्डन, रॅपलिंग, बारमाही धबधबे तयार करणे, तिलारी खाडीमध्ये बोटिंग, यांत्रिकी शेती, कृषी आर्मी नीरा, काथ्या उद्योग, कुक्कुटपालन, मेंढीपालन, महिलांसाठी खेकडा पालन यासह अशा अनेक शेकडो योजनांची घोषणा त्यांनी केली, या योजनांचे काय झाले ? याचे उत्तर केसरकर यांनी जनतेला द्यावे. केसरकर यांनी शिवसैनिकांना नीतिमत्ता शिकवू नये, शिवसेना ही रस्त्यावर काम करणारी संघटना आहे. त्यामुळे केसरकर जर घरात बसून निवडून येणार असतील तर जनता त्यांना कायमचे घरात बसविल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास परब याने व्यक्त केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून केवळ सहा महिन्याचा कालावधी मिळाला, दोन वर्षे कोरोना जागतिक महामारीच्या संकटामध्ये गेली. कोरोना आटोक्यात येत असताना ते आजारी असताना या सर्व दगाबाजांनी बंडखोरी केली, याचे सर्वात मोठे दुःख आहे. मात्र जनता या बंडखोरांना कधीही माफ करणार नाही. बंडखोरांना मतपेटीतून उत्तर देईल असा विश्वास परब यांनी व्यक्त केला आहे.