मळगांव मधील महिलांचा धाडसी निर्णय व धाडसी पाऊल..
सावंतवाडी
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान ( उमेद) या संस्थे अंतर्गत शारदा ग्राम संघ मळगांव, तालुका सावंतवाडी या महिला बचत गटाच्या महिलांनी विधवा प्रथा ही अनिष्ठ प्रथा मोडीत काढण्याचे धाडस दाखवले आहे. या साठी या महिलांनी विधवा प्रथेसारख्या कुप्रथा मळगांव सहित आसपासच्या परिसरातील अनिष्ठ प्रथा पाळणार नाही असा निर्धार केला आहे. या निर्धारा अंतर्गत या महिलांनी महाराष्ट्र शासनाच्या शासन पत्रकाची आदर राखून तसा ठराव घेतला. हा ठराव नुकताच एका सभेत सर्वानुमते मंजूर करुन एक नवा पायंडा पाडला आहे.
शारदा ग्राम संघ या संघाच्या नुकत्याच 15 जुलै 2022 रोजी घेण्यात आलेल्या मासिक सभे अंतर्गत एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत समाजात प्रचलित असलेल्या अनिष्ठ विधवा प्रथेचे निर्मुलन करण्याचा विषय मांडण्यात आला होता. या विषयाला सर्व महिला सदस्यांनी पाठिंबा दर्शवला. या पाठिंब्यानुसार ” आज 21 व्या शतकातही वावरताना समाज विज्ञानवादी व प्रगतशील समाज म्हणून वाटचाल करत असतानाही काही अनिष्ठ प्रथा रुजवत आहोत व वाढवत आहोत. विशेषतः पतीच्या निधनानंतर पत्नीचे कुंकू पुसणे, तिच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातील जोडवी काढणे यासारख्या कुप्रथांचे समाजात पालन केले जात आहे. तसेच यानंतर अशा महिलांना समाजात कोणत्याही प्रकारच्या धार्मिक व सामाजिक कार्यक्रमात सहभागी होऊ दिले जात नाही. पती निधनानंतर समाजात वावरताना त्या महिलेला प्रचंड अवहेलना सोसावी लागते. अशा विधवा महिलांना प्रतिष्ठीत जीवन जगण्याची मानवी अधिकार तसेच भारतीय संविधानानुसार बहाल करण्यात आलेल्या समतेच्या हक्काचेही उल्लंघन केले जाते. कोणतीही महिला वैधव्य स्वतःहून मागत नसते. किंवा अशा प्रकारचे जीवन आपणास मिळावे असे कोणीही महिलेला वाटत नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या अवहेलनेतून तिची मुक्तता व्हावी असे आम्हा सर्व महिलाउ वाटत आहे. त्यामुळेच यानंतर अशा कुप्रथा आपली महिंलासोबत न पाळण्याचा आम्ही महिला शासनाच्या परीपत्रकाचा आदर राखून यापुढे अशा प्रथांचे पालन आम्ही करणार नाही, असे या महिलांनी सर्वानुमते ठरविले आहे. हा ठराव मळगांव मधील या महिलांनी मंजूर केला आहे.
सूचक माधवी मुकुंद राऊळ यांनी सुचविलेल्या या ठरावाला अनुमोदन अर्चना चंद्रकांत जाधव यांनी अनुमोदन दिले आहे. यावेळी ज्योती ग्राम संघाच्या सी.आर.पी. रत्नप्रभा रघुवीर नाईक ( ब्राह्मण पाट), जीवन ग्राम संघाच्या सी.आर.पी. राघीणी राजाराम शिरोडकर (कुंभार्ली), शारदा ग्राम संघाच्या सी.आर.पी.विजया विजय गवंडे तसेच ग्रामपु सदस्य निकिता निलकंठ बुगडे आदी उपस्थित होत्या. याबाबतची माहिती शारदा ग्राम संघाच्या अध्यक्ष दिव्या यांनी दिली आहे.