जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी हेमंत कुलकर्णी यांची अप्रतिम गझल रचना
गळसरी
देवप्रिया वृत्त
काय सांगू शब्द माझे गोठलेले राहिले
मान वेळावून जाता पाठमोरे पाहिले
लांब वेणी शेपटा तो रंग गोरा केतकी
हास्य ओठी दंतमोती शुभ्रतेने नाहिले
चालताना नाद करती पैंजणाचे घुंगरू
ठाव घेती काळजाचा चित्त तुजला वाहिले
दूर जाता तू तरीही मी उभा राही तिथे
ऊन वा पाऊस थंडी सर्वकाही साहिले
काळ कोठे वर्ष लोटे वाट पाहे मी तुझी
मंद वार्यासंग येथे मन उन्हाने दाहिले
आस होती मान्य करशी प्रेम माझे पाहता
बद्ध होशी तू मनाने स्वप्न मी ते पाहिले
आज तू दिसलीस हसता भरजरी त्या पैठणी
नेत्र विस्फारून माझे तोंड उघडे राहिले
कुंकवाचा चंद्र भाळी कंकणाच्या हिरवळी
गळसरी पाहून माझे स्वप्न पुरते वाहिले
—हेमंत कुलकर्णी
मुलुंड, मुंबई