आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत कणकवली नगरपंचायतमार्फत विविध उपक्रम राबवणार
कणकवली
आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत कणकवली नगरपंचायत व कणकवली कॉलेजच्या वतीने कणकवली शहरात विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. कणकवली शहरामध्ये 13 ते 15 ऑगस्ट या दरम्यान अनेक उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. 15 ऑगस्ट रोजी कणकवली शहरातून भव्य प्रभात फेरी देखील काढली जाणार आहे. तर कणकवली कॉलेज च्या मैदानावर या निमित्ताने “सेल्फी पॉइंट” ची उभारणी करण्यात येणार आहे. असा निर्णय कणकवली नगरपंचायत मध्ये झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
कणकवली नगरपंचायत मध्ये “आझादी का अमृत महोत्सव” अंतर्गत “हर घर तिरंगा” उपक्रम राबविण्या बाबत बैठक घेण्यात आली. या बैठकीला नगराध्यक्ष समीर नलावडे, कणकवली कॉलेजचे प्राचार्य राजेंद्रकुमार चौगुले, नगरसेवक ऍड. विराज भोसले, किशोर धुमाळे, लेखापाल प्रियांका सोंसुरकर, रुचिता ताम्हणकर, अमोल भोगले, सतीश कांबळे आदि उपस्थित होते.
कणकवली शहरात सर्व घरांवर फडकविण्यात येणारे झेंडे नगरपंचायत मार्फत दिले जाणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांना देखील नगरपंचायत कडूनच झेंडे पुरवठा करण्यात येणार असल्याचे या बैठकीत श्री नलावडे यांनी सांगितले. तसेच या तीन दिवस होणाऱ्या उपक्रमामध्ये 15 ऑगस्ट रोजी काढल्या जाणाऱ्या प्रभात फेरी करिता विद्यार्थ्यांना खाऊ वाटप देखील करण्याची ग्वाही नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. कणकवली शहरालगतच्या सर्व शाळां मधील विद्यार्थ्यांना या प्रभात फेरीत सहभागी होण्यासाठी शाळांना पत्र देण्यात येईल असे देखील श्री नलावडे यांनी सांगितले. तर प्राचार्य राजेंद्रकुमार चौगुले यांनी कॉलेज पटांगणावर या कालावधीत सेल्फी पॉईंट तयार करायचा असल्याचे सांगितले. त्यावर नगराध्यक्ष श्री नलावडे यांनी हे काम तात्काळ मार्गी लावण्यात येईल अशी ग्वाही दिली. शासनाकडून 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत हा उपक्रम राबविण्यात या सूचना देण्यात आल्या आहेत. या कालावधीत कणकवली नगरपंचायत कडून कणकवली कॉलेजला लागणारी सर्वतोपरी मदत केली जाईल अशी ग्वाही देखील श्री .नलावडे यांनी बैठकीत दिली.