वेंगुर्ले
वेंगुर्ले नगरपरिषदेच्या सन 2022 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी आरक्षणाची तारीख अखेर ठरली असून 28 जुलै रोजी दुपारी 3 वाजता ही आरक्षण सोडत होणार आहे. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण (महिला) आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे.
वेंगुर्ले नगरपरिषदेच्या लोकनियुक्त सदस्य पदांसाठी जिल्हाधिकारी यांनी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार 13 जून रोजी आरक्षण सोडत होणार असल्याचे जाहीर केले होते.
मात्र शासनाकडून त्या आरक्षण सोडत कार्यक्रमाला स्थगिती दिल्याने ही तारीख पुढे गेली होती. अखेर ओबीसी आरक्षणाच्या निर्णयानंतर निवडणूक आयोगाने आता निवडणूक प्रक्रिया पुन्हा सुरू केली आहे. त्यानुसार वेंगुर्ले नगर परिषदेच्या सदस्य पदांची आरक्षण सोडत 28 जुलै रोजी वैगुली नगरपरिषद च्या श्री शिवाजी महाराज सभागृह येथे दुपारी तीन वाजता होणार आहे. तर नागरिकांच्या माहितीसाठी व हरकती तसेच सूचना मागविण्याकरिता 29 जुलै रोजी या आरक्षण सोडतीची प्रसिद्धी करण्यात येणार आहे. दरम्यान आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना असल्यास नागरिकांनी सोमवार 1 ऑगस्ट दुपारी 3 वाजे पर्यंत मुख्याधिकारी वेंगुर्ले नगरपरिषद यांच्याकडे सादर करावयाचे आहेत. विहित कालावधीनंतर प्राप्त होणाऱ्या हरकती व सूचनांचा विचार केला जाणार नाही, असे निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.