कोण हा विनायक ठाकूर….????

कोण हा विनायक ठाकूर….????

राज्य उत्पादन शुल्कच्या पथकांनी अत्यंत गुप्तपणे केलेल्या कारवाईत कोलगाव, ता.सावंतवाडी येथून विनायक ठाकूर नामक इसमाला अवैद्य दारू तस्करी प्रकरणी ताब्यात घेतले होते. उत्पादन शुल्क विभागाच्या राज्यातील सहा पथकांनी मिळून संशयिताच्या मोबाईल लोकेशनवरून सावंतवाडी शहरातील एका हॉटेलला घेराव घातला होता, परंतु तिथे संशयित न सापडल्याने त्याच्या कोलगाव येथील घरावर छापा टाकत त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या.
विनायक ठाकूर हा २०१८ साली घडलेल्या दारू तस्करीच्या एका गुन्ह्यात राज्य उत्पादन शुल्क ला हवा होता, परंतु गेली दोन वर्षे तो गुंगारा देत होता. विनायक ठाकूर याला ताब्यात घेऊन उस्मानाबाद येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. विनायक ठाकूर याचे दारू धंद्याशी असलेले मोठे संबंध पाहता उत्पादन शुल्क विभाग त्याचे बँक खाते सुद्धा तपासणार आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या गुप्तपणे केलेल्या कारवाईमुळे अवैद्य दारूधंद्याशी संबंधित असलेल्या अनेक ठाकुरांचे धाबे दणाणले आहेत. काहीजण भूमिगत झालेले आहेत. अवैद्य धंद्यात आपल्याला पोलीस अथवा तत्सम विभागाकडून त्रास होऊ नये म्हणून काही गैरधंदेवाल्यांनी राजकीय पदे घेत राजकीय आश्रय मिळविला आहे.
सावंतवाडीत अलीकडेच अवैद्य दारूचा व्यवसाय जोमाने फोफावला आहे. कोवळ्या तरुण मुलांना हाताशी धरत त्यांना पैसा गाडीचे आमिष दाखवत दारू धंद्यात ओढले जात आहे. अवैध्य गोवा बनावटीच्या दारूचा हा व्यवसाय राज्यभर पसरला आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, मुंबई येथेही दारू व्यावसायिकांनी आपली जाळी विणली आहेत. सोलापूर येथील मुख्य व्यावसायिक असून त्याने सिंधुदुर्ग ते मुंबई पर्यंत आपला व्यवसाय निर्विघ्नपणे चालण्यासाठी माणसे पेरलेली आहेत, त्यामुळे दारूची वाहतूक सहजपणे केली जाते. विनायक ठाकूर हा देखील सोलापूर येथील दारू व्यवसायिकाचाच माणूस.
गोवा बनावटीच्या दारूच्या व्यवसायात बक्कळ पैसा मिळविल्याने अनेक व्यावसायिक आणि त्यांची माणसे निगरगट्ट झाली आहेत. त्यामुळे पैशांसाठी तरुण पिढीला या व्यवसायात गुंतवून येणारी पुढची पिढी बरबादीकडे नेत असल्याने चिंतेचा विषय बनला आहे. हे दारू व्यावसायिक त्यांच्या व्यवसायात अडचण निर्माण करणाऱ्या उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना देखील हल्ले करून संपविण्याचा प्रयत्न करतात. दारू व्यावसायिकांच्या गुंडागिरीला कंटाळून उत्पादन शुल्क विभागाने अशाच एका प्रकरणात २०१८ पासून गुंगारा देणाऱ्या विनायक ठाकूर याला सहा पथकांच्या सहाय्याने घेराबंदी करत त्याच्या कोलगाव येथील घरातून ताब्यात घेऊन उस्मानाबाद न्यायालयात हजर केले व पोलीस कोठडी मिळाल्यावर मुंबई येथे उर्वरित तपासासाठी नेण्यात आले.
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून विनायक ठाकुरची कसून चौकशी करण्यात येत असून त्याच्या मोबाईल मधील संपर्कामधून दारू व्यवसायातील इतर धंदेवाल्यांचे कंबरडे मोडण्यासाठी त्यांची पाळेमुळे खणून काढण्याच्या प्रयत्नात राज्य उत्पादन शुल्क विभाग आहे. राज्य उत्पादन शुल्कच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात येऊन केलेल्या धडक कारवाईमुळे गोवा बनावटीच्या अवैध धंद्यांना चाप बसेल अशी आशा सिंधुदुर्गवासीयांना वाटत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा