विज वितरण ठेकदार एजन्सी मार्फत प्रत्येकी दहा लाख रुपयाची मदत
कंत्राटी विज कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत यांच्या पाठपुराव्याला यश
मालवण :
विजेचा धक्का लागून अपघाती मृत्यू झालेले महावितरण कंपनीचे कंत्राटी कर्मचारी आनंद मिराशी (आचरा) आणि राकेश मोंडकर (तांबळडेग) यांच्या कुटुंबियांना भाजपा नेते निलेश राणे व कंत्राटी विज कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत यांच्या पाठपुराव्यातून विज वितरण कंपनीच्या ठेकदार एजन्सी मार्फत प्रत्येकी दहा लाख रुपयाची मदत मिळवून देण्यात आली आहे. याबाबत प्राप्त झालेले धनादेश भाजप नेते निलेश राणे यांच्या हस्ते मीराशी, मोंडकर कुटुंबियांना गुरुवारी देण्यात आले.
दरम्यान, या संपूर्ण प्रसंगात आम्हाला न्याय मिळवून देणाऱ्या निलेश राणे, अशोक सावंत व भाजपा पदाधिकाऱ्यांचे मीराशी कुटुंबियांनी आभार मानले आहेत.
आचरा येथे विज दुरुस्तीचे काम करत असताना आनंद मिराशी यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला होता. तर राकेश मोंडकर हे इळये येथे विज दुरुस्तीचे काम करत असताना विजेचा धक्का लागून त्यांचा मृत्यू झाला होता. या कंत्राटी कामगारांना न्याय मिळावा, यांच्या कुटुंबियांना मदत मिळावी, यासाठी कंत्राटी कर्मचारी सांघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत यासह अन्य संघटना पदाधिकारी, भाजपा पदाधिकारी यांनी पाठपुरावा सुरु ठेवला. भाजपा नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून विज वितरण व ठेकेदार एजन्सी यांच्याकडे पाठपुरावा सुरु होता. पहिल्या टप्प्यात मीराशी कुटुंबियांना दोन लाख रोख स्वरुपात, अडीच लाख बँक खात्यात जमा झाले होते. तर राकेश मोंडकर यांच्या कुटुंबियांच्या बँक खात्यात अडीच लाख जमा करण्यात आले होते. प्रत्येकी दहा लाख रुपये मदती पैकी जमा रक्कम व्यतिरिक्त उर्वरित रकमेचे धनादेश मीराशी, मोंडकर कुटुंबियांना निलेश राणे यांच्या हस्ते मालवण येथे सुपूर्द करण्यात आले.
यावेळी कंत्राटी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, रवी मालवणकर, मोहन कुबल, विजय निकम आदी उपस्थित होते.