*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी संजय माकोणे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*महामारीने घात केला*
महामारी आली दारी,आईची निघाली स्वारी
शब्द देवूनी गेली,“पोरा येईलरे माघारी.”
एके दिवशी तुला आई,नेण्याची झाली घाई
महामारीने घात केला,तू पुन्हा आली नाही.
पदर ओला झाला तेव्हा,“म्हणाली आता येते”
भिडता नजर आपली,ते डोळे ओले होते.
उगीच बोलली, “डोळ्यामध्ये गेले माझ्या काही”
महामारीने घात केला,तू पुन्हा आली नाही.
वाकून जेव्हा मस्तकी,तू लावि मातीचा टिळा
खरे सांगतो,तेव्हाच गेली अंगणाची कळा.
भिंतीही रडल्या जाताने, भेटली त्यांना नाही
महामारीने घात केला,तू पुन्हा आली नाही.
हात सोडताना माझे,तू घट्ट धरले होते
थरारला जीव माझा,ते मौन बोलके होते.
तू डोळे भरूनी माझ्याकडे, एकटक पाही
महामारीने घात केला,तू पुन्हा आली नाही.
संजय माकोणे,
अमळनेर,ता.नेवासा,जि.अहमदनगर