You are currently viewing पाऊस किती आठवणीचा पडत राहिला शांतपणाने

पाऊस किती आठवणीचा पडत राहिला शांतपणाने

*मराठी बालभारती थीम साँग शॉर्ट फिल्म आदींसाठी उत्कृष्ट काव्यलेखन केलेल्या नंदुरबार येथील ज्येष्ठ लेखिका कवयित्री सुनंदा भावसार यांची अप्रतिम गझल रचना*

पाऊस किती आठवणीचा पडत राहिला शांतपणाने
ती गेल्यावर सुन्या घराला छळत राहिला शांतपणाने

आभाळाचे पडले पाणी किती बिया मग तशाच रुजल्या
बागेमधला कणकण हळवा… रडत राहिला शांतपणाने

ती असताना कायम बडबड ,गडबड घाई… किती निरंतर
समोर त्याला जुना मूकपट दिसत राहिला शांतपणाने !

घरभर तोही हरवत नाही चष्मा आता तिथेच असतो
‘कुठे हरवली?’ एक वेंधळी… बघत राहिला शांतपणाने…

निसर्गातला नियम जुना हा मावळतीची उन्हे उतरली
गुलाल उधळत सूर्य केशरी बुडत राहिला शांतपणाने

तिच्या गझलचा शब्दशब्द मग स्मरत राहिला शांतपणाने
नश्वरतेचा खयाल नंतर डसत राहिला शांतपणाने

जंगलातले काजळकाळे अंधाराचे राज्य पसरले
आणि चंद्रमा गूढ शांतता झरत राहिला शांतपणाने

सौ.सुनंदा सुहास भावसार

प्रतिक्रिया व्यक्त करा