*जिव्हाळ्याचे पाच प्रश्न मुख्यमंत्र्यांनी सोडवल्यामुळे आपला वाढदिवस आगळावेगळा*
सिंधुदुर्ग :
महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जेवढे नाव गाजतय त्याच्या जोडीनेच सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांच्या नावाचा उल्लेख वारंवार होताना आपण पाहतो आहोत. उद्या १८ जुलैला आमदार दीपक केसरकर यांचा वाढदिवस… वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आमदार दीपक केसरकर यांनी झूम मीटिंगद्वारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांशी संवाद साधला. झूम मीटिंग साठी उपस्थित असलेल्या सर्व पत्रकारांचे सर्वप्रथम आभार मानले. पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच आपले मनोगत व्यक्त करताना दीपक केसरकर यांनी उद्याच्या वाढदिवसाला सिंधुदुर्ग जिल्ह्यात येता येणार नसल्याचे सांगत राष्ट्रपती पदाची निवडणूक असल्याने आज तरी आपणा सर्वांना भेटावे म्हणूनही झूम मीटिंग आयोजित केल्याचे आवर्जून सांगितले. याप्रसंगी बोलताना दीपक केसरकर यांच्या चेहऱ्यावर तेज आले होते आणि त्याचे कारण म्हणजे आपल्या जिव्हाळ्याचे पाच प्रश्न जे गेली अडीज वर्ष रखडलेले होते, ते मुख्यमंत्र्यांनी एका दिवसात सोडवले. त्यामुळे उद्याचा आपला वाढदिवस हा आगळावेगळा वाढदिवस आहे असे केसरकर म्हणाले. विशेष म्हणजे महत्त्वाचे प्रश्न सुटले तो आनंद आपल्यासाठी मौल्यवान आहे. त्यात मुख्यत्वे कबुलायतदार गावकर जमीन प्रश्न हा होता. कबुलयातदार जमीन प्रश्नांमध्ये जमिनीचे योग्य वाटप झाले पाहिजे, पण वनखात्याने जमीन वाटप असलेला अडथळा दूर न केल्याने मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने तो अडथळा दूर होणार असा निर्णय झाल्याचे सांगून संपूर्ण गावाची जमीन वाटप होताना सुंदर आंबोली, गेळे ही गावे उभी राहिली पाहिजेत. त्याचबरोबर चौकुळच्या लोकांचा जमीन प्रश्न हा वेगळा आहे, त्यासाठीही मुख्यमंत्र्यांनी महसूलचे अतिरिक्त मुख्य सचिव व त्यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव चौकुळ गावात भेट देऊन हा प्रश्न मार्गी लागण्यासाठी प्रयत्न करणार आहेत, हे देखील सांगितले. आपण ज्यासाठी राजकारणात आलो त्याचे सार्थक हे प्रश्न सुटल्यानंतर होईल असे त्यांनी आपल्या मनोगतात मांडले. कबुलायतदार गावकर जमीन प्रश्नाबरोबरच आंबोली साठी मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र मंजूर होत असून अभ्यासक्रमासाठी आंबोली मध्ये चांगले वातावरण आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाची मोठमोठी विद्यापीठे ही हिल्स स्टेशनवरच आहेत. त्यामुळे आंबोली मध्ये होत असलेले मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र ही कौतुकाची बाब आहे. या उपकेंद्रामधून बायोडायव्हर्सिटी वर आधारित कोर्स घेतले जातील. भविष्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे युग येणार असून आंबोलीत त्या दृष्टीने शिक्षण दिले जाणार. केंद्र शासनाच्या धोरणाने भविष्यात उपकेंद्राचे रूपांतर युनिव्हर्सिटीत झाले तर खूप फायद्याचे ठरेल. मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंशी आपले बोलणे झाले त्याप्रमाणे कुलगुरूंनी इंटरनॅशनल स्कूल सुद्धा घेण्याचे मान्य केले असल्याचे दीपक केसरकर म्हणाले.
आंबोली हा बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आहे, त्यामुळे तिथे इंडस्ट्री येणार नाही तर पर्यटनावर आधारित उद्योग येणार. त्यामुळे निसर्गाची हानी होणार नाही, जिल्ह्यातील युवकांना चांगला रोजगार उपलब्ध होणार व यासाठी आपण स्वतः पुढाकार घेऊन हे सर्व करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्याला सर्वांना स्वप्नातला सिंधुदुर्ग जिल्हा उभा करायचा आहे. परदेशातील अनेक राष्ट्र पर्यटनावर चालतात, त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा पर्यटनावर आधारित उद्योग आले तर नक्कीच सिंधुदुर्ग जिल्हा सधन होईल. शिंदे साहेबांचे गतिमान सरकार महाराष्ट्रात स्थापन झालेले आहे त्यामुळे गेली अडीज वर्षे रखडलेले सर्व उद्योग प्रकल्प पूर्णत्वास जातील अशी त्यांनी हमी दिली. आपण पालकमंत्री असताना शहरांना मोठ्या प्रमाणावर निधी दिला, त्यामुळे इतर शहरांमध्ये देखील सावंतवाडी सारखी गार्डन उभी राहिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होणारा हापूस आंबा त्याच्यावर प्रक्रिया प्रकल्प, निर्यातीसाठी प्रयत्न केले जातील. चांदा ते बांदा मधून मच्छीमारांसाठी पिंजरा योजना, वातानुकुलीत व्हॅन आदी योजना राबविल्या होत्या. परंतु काही गैरसमज असल्याने त्या योजना पूर्णत्वास गेल्या नाहीत ते मच्छीमारांमधील गैरसमज दूर करून रोजगार निर्मिती साठी प्रयत्न केले जाणार. केवळ मच्छीमारांचे नव्हे तर महिला, युवक, शेतकरी त्याचबरोबर जिल्ह्यातील व्यापाऱ्यांसाठी सुद्धा योग्य असे कार्य केले जाईल असे केसरकरांनी सांगितले. सावंतवाडी शहराच्या बाहेरून एक राष्ट्रीय महामार्ग गेल्यामुळे शहराचा विकास खुंटला होता, परंतु बांदा – संकेश्वर हा गोव्याला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग सावंतवाडी शहरातून जात असल्याने एक महामार्ग बाहेर गेल्याची खंत दूर होईल असे केसरकर म्हणाले.
शिवरामराजे भोसलेंनी आपल्याला राजकारणात आणलं, त्यांचे नातू असलेले लखमराजे भोसले येऊन मुख्यमंत्र्यांशी बोलतात त्याचा आपल्याला आनंद आहे. बापूसाहेब महाराजांनी शिकवलेली संस्कृती आपण टिकवली पाहिजे असे इथे म्हणाले. उद्धव साहेबांसोबत काम करताना चांगले अनुभव आले. उद्धव साहेबांचा प्रेमळ स्वभाव, आदित्य साहेबांचा चांगला स्वभाव हा देखील जवळून पाहता आला. परंतु शिंदे साहेब सर्वसामान्यांचे नेते आहेत, सर्वांना मदत करण्यासाठी ते नेहमीच पुढे असतात. त्यामुळे शिंदे साहेबांबरोबर काम करताना आनंद होत आहे. आपल्या राजकीय कारकीर्दीत ज्यांनी ज्यांनी आपल्याला मदत केली त्यातील सर्वांचीच नाही पण अनेकांची नावे दीपक केसरकर यांनी आवर्जून घेतली. त्यात कै.प्रकाश परब यांनी आपण मंत्री असताना सावंतवाडीतील आपल्या ऑफिसचा संपूर्ण कार्यभार सांभाळल्याची आठवण करून दिली. बबन साळगावकर, राजन पोकळे, अशोक दळवी, कुडाळ येथील भोगटे, मालवणातील नितीन वाळके आदी अनेक कार्यकर्त्यांची कठीण प्रसंगात साथ मिळाल्याचे त्यांनी प्रांजळपणे सांगितले. आपल्या आमदारकीसाठी कै.गुरुनाथ कुलकर्णी केलेला प्रयत्न त्यानी आवर्जून आठवण करून दिला. त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण राणेंनी चांगले मेडिकल कॉलेज काढले आहे, परंतु जिल्ह्यात चांगली इंजीनियरिंग कॉलेज आली पाहिजे असे सांगतानाच सिंधुदुर्ग जिल्हा हा सर्वोत्कृष्ट निसर्ग, सर्वोत्कृष्ट समुद्रकिनारे लाभलेला जिल्हा आहे. त्यामुळे महाराष्ट्रातच नव्हे तर देशात, जगात सुंदर जिल्हा भविष्यात सिंधुदुर्ग जिल्हा होणार असे सांगताना भारतातला सर्वच सर्वात स्वच्छ जिल्हा, टॅक्स न चुकवणारा जिल्हा, वीज चोरी नसलेला जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख आहे असे सांगीतले. आपल्या राजकीय कारकीर्दीत ज्यांचे ज्यांचे सहकार्य मिळाले त्यांचे शेवटी आभार मानले.
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना चांदा ते बांदा ही योजना पुन्हा सुरू होणार का? यावर बोलताना दीपक केसरकर म्हणाले, चांदा ते बांदा ही आपण तयार केलेली योजना सर्व जिल्ह्यांसाठी होती. परंतु पायलट बेसिसवर दोन जिल्हे पहिल्या वर्षासाठी सामील केले होते ते म्हणजे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी. त्यानंतर महाराष्ट्रातील प्रत्येक वर्षी एक – एक जिल्हा या योजनेच्या अंतर्गत घेण्यात येणार होता. मागील सरकारने ती बंद करून लोकांचे नुकसान केले. नव्याने आलेले सरकार मधील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ही योजना परत सुरु करण्यासाठी बोलले तर त्या योजनेवर काम करण्यासाठी आपण तयार असून आपल्याला आनंद वाटेल. जिल्ह्याचा विकास होणार असे आपण सांगता परंतु राजकीयवादी वादावादी मुळे जिल्ह्याचा विकास रखडला मग राणे केसरकर वादात आपण पहिले पाऊल पुढे टाकणार का? असा प्रश्न विचारल्यावर केसरकर म्हणाले, नारायण राणे हे ज्येष्ठ नेते आहेत, राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा राहिलेले आहेत. आपण पहिले पाऊल टाकले परंतु भाजपात अजून ज्येष्ठ लोक आहेत त्यामुळे जिल्ह्याचा विकासासाठी राणे साहेबां सोबत काम करताना अडचण येणार नाही.
राणे साहेबांचे कौतुक केला हा सकारात्मक बदल म्हणायचा का? असा प्रश्न उपस्थित केल्यावर केसरकर म्हणाले, आपण राणेंनी मेडिकल कॉलेज काढले तेव्हाही कौतुक केले होते. सतीश सावंत यांनी आपल्याला कॉलेजवर येण्याचे देखील निमंत्रण दिले होते परंतु राणे बोलवतील तेव्हा नक्कीच जाणार. सावंतवाडी येथे होणाऱ्या मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलच्या जागेचा प्रश्न व राजघराण्याशी जागे संदर्भात चर्चा झाली का? यावर बोलताना केसरकर म्हणाले राजघराण्याचे चांगले सहकार्य लाभले असून युवराज लखमराजे स्वतः भेटले व राणी सरकारांचाही आपल्या सोबत फोन झाला होता. त्याचबरोबर वेंगुर्ला येथे होणारे सागरी संशोधन केंद्र हा मैलाचा दगड ठरेल. वेंगुर्ला येथे एक पाणबुडी येईल त्यामुळे वेंगुर्ल्यातील सागरी संशोधन केंद्र ही अभिमानास्पद गोष्ट आहे. सावंतवाडी येथे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होणार असेच म्हणून चालणार नाही तर वेंगुर्ला येथेही दहा कोटी रुपये खर्च करून हॉस्पिटल झाले असून 27 कोटीचे हॉस्पिटल दोडामार्ग येथे होत आहे. परंतु हॉस्पिटल साठी चांगला स्टाफ आला पाहिजे यासाठी प्रयत्न करणार. बांदा संकेश्वर राष्ट्रीय महामार्ग सावंतवाडी शहरातून जाणार की रिंग रोडने? याबाबत बोलताना केसरकर म्हणाले हा निर्णय सर्वस्वी सार्वजनिक बांधकाम विभाग घेणार व रिंग रोड देखील शहरातच आहे त्यामुळे सावंतवाडी शहरातूनच हा मार्ग जाणार. पुढे जाऊन एक रस्ता बांदा मार्गे गोव्याला जोडला जाईल तर दुसरा फाटा रेडी कडे जाणार आहे. द्रौपदी मुर्म या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार असून त्यांना महाराष्ट्रातून दोनशे आमदार पाठिंबा देणार या विषयावर बोलताना दीपक केसरकर म्हणाले आमच्याकडे 165 आमदार असले तरी राष्ट्रपतीपदाची निवडणूक ही पक्षाच्या पलीकडे जाऊन मतदान केली जाते. या निवडणुकीला पक्षाचा व्हीप नसतो, त्याचबरोबर देशात पहिल्यांदाच एका आदिवासी महिलेला राष्ट्रपती पदासाठी उभे केलेले आहे त्यामुळे महाराष्ट्रातील इतर आमदारांनी देखील द्रौपदी मुर्म यांना मतदान करावे असे आपल्याला वाटते. केंद्रात आपल्याला मोठी जबाबदारी मिळणार असे म्हटले जाते यावर बोलताना, सध्या शिवसेनेच्या खासदारांना ही जबाबदारी मिळावी असे आपले मत आहे असे सांगत केसरकर यांनी भविष्यात तशी संधी मिळाली तर ती संधी कोण सोडणार आहे का? असा प्रतिप्रश्न करत सध्या ती संधी शिवसेनेचे खासदारकी लढवलेले खासदार आहेत त्यांना मिळावी अशीही इच्छा व्यक्त केली. राज्यात आपल्याला मोठी जबाबदारी मिळणार का? या प्रश्नावर बोलताना, आपण मागणी केली नाही, प्रवक्ते म्हणून शिंदे गटाची जबाबदारी घेऊन बाजू मांडली. परंतु संधी मिळाली तर नक्कीच या संधीचे सोने करून कोकणचा विकास साधणार. शिंदे/ठाकरे एकत्र येणार का? या प्रश्नावर बोलताना, स्वतः राऊत यांनी त्याचे उत्तर दिलं आहे, असे सांगत “केसरकर यांना यावर बोलण्याचा अधिकार कोणी दिला?” असे म्हटल्याची आठवण त्यांनी करून दिली. परंतु सध्या तरी तसे काही घडताना दिसत नाही असेही त्यांनी सांगितले. खरी शिवसेना कोणाची? या प्रश्नावर बोलताना, जिथे बाळासाहेबांचे विचार आहेत, सर्वात जास्त आमदार आहेत, त्यांची शिवसेना आहे असे सांगताना उद्धव साहेबांकडे चांगले विचार आहेत परंतु काँग्रेस राष्ट्रवादीची साथ त्यांनी सोडली नसल्याचेही ते म्हणाले. संजय राऊत अजून भूमिकेतून बाहेर येत नाहीत का? यावर बोलताना यावर आपल्याला काही सांगायचे नसून राष्ट्रवादीचा त्यांच्यावर सर्वात जास्त प्रभाव आहे परंतु ते जे काही बोलतात किंवा आपण त्यावर बोलतो हा राजकारणाचा एक भाग असतो राऊत आपले शत्रू नसल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.
रिफायनरी संदर्भात दीपक केसरकर यांची भूमिका काय असेल? असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला तेव्हा, लोकांचा विरोध नाही तिथे रिफायनरी झाली तर नक्कीच कोकणचा विकास होणार, पण निसर्ग हानी न होता योग्य जागी रिफायनरी झाली तर ते कोकणच्या फायद्याचे ठरेल असे त्यांनी सांगितले. राज्य सरकार रिफायनरी बाबत निर्णय घेणार का? यावर बोलताना, शिंदे साहेबांचे सरकार हे गतिमान सरकार आहे, ते नक्कीच चांगल्या प्रकारे महाराष्ट्रासाठी काम करेल असे सांगितले. केंद्रात जायला आवडेल की राज्यात रहायला आवडेल? या प्रश्नावर बोलताना, दीपक केसरकर यांनी आपल्याला सत्य होणारी स्वप्न पाहायला आवडतात, जी स्वप्न सत्यात येत नाहीत ते आपण बघत नाही. परंतु संधी मिळाली तर चांगलीच पण ही फक्त तुम्ही स्वप्न दाखवता असे सांगितले. त्याचबरोबर येणारी नगरपरिषद आम्ही शिवसेना व भाजप युती करून लढणार हे देखील आवर्जून सांगितले.