*शिंदे, फडणवीस सरकार औटघटकेचे*
*शिवसेना प्रवक्ते डॉ.जयेंद्र परुळेकर यांचा आरोप*
सावंतवाडी :
शिंदे,फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपद कोणाला द्यावीत,यावरून वाद सुरू आहे. हे सरकार औट घटकेचे ठरेल, त्यामुळे पटापट निर्णय घेतले जात आहेत. असा आरोप शिवसेनेचे प्रवक्ते डॉ. जयंत परुळेकर यांनी केला आहे.
या सर्व घडामोडीनंतर दीपक केसरकर हे आंबोली कबूलायतदर गावकर प्रश्न सोडविणार असल्याचे सांगून आंबोली चौकुळ लोकांची दिशाभूल करीत आहेत, असेही त्यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
फंदफितुरी आणि बंडखोरी करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मविआ सरकार घात करून पाडण्यात आले, आणि नवे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या दोन मंत्र्यांची शपथविधी झाली. या गोष्टीला आता दोन आठवडे पूर्ण झाले आहेत. तरी अजून मंत्री मंडळाचा पत्ताच नाही.
राष्ट्रपती निवडणुकीचे कारण पुढे करून वेळ मारून नेली जात आहे. खरंतर या शिंदे, फडणवीस सरकारवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची टांगती तलवार आहे आणि मंत्री पदाच्या वाटपावरून मोठे वाद होत आहेत. हेच मंत्रिमंडळ स्थापनेतील विलंबामागील खरं कारण आहे, असा आरोप त्यांनी केला.
तर महाराष्ट्रातील जनतेमध्ये सर्व प्रकारची उलट सुलट चर्चा होत आहे. संपूर्ण देशात हा एक हास्य विनोदाचा आणि थट्टेचा विषय होत आहे. महाराष्ट्रसारख्या औद्योगिक, शैक्षणिक, सामाजिकदृष्ट्या देशात अग्रेसर असलेल्या राज्याचा उज्वल राजकीय परंपरेचा हा एक तमाशात मांडलेला दिसून येत आहे. रात्रीच्या अंधारात वेषांतर करून षडयंत्राने बनवले हे दोन मंत्र्यांची सरकार घटनाबाह्य असून औटघटकेचे सरकार असणार हे आता सामान्य जणांना देखील समजले आहे, अशी टिका डॉ. परुळेकर यांनी केली आहे.