कणकवली
येथील परमहंस भालचंद्र महाराज संस्थान या संस्थेच्या शैक्षणिक मंडळामार्फत १९८२ पासून शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश प्राप्त होण्यासाठी सातत्यपूर्ण मार्गदर्शन वर्ग व सराव परीक्षेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी २४ जुलै २०२२ पासून शैक्षणिक मंडळामार्फत हे मार्गदर्शन वर्ग सुरू होत आहेत.
यावर्षी किमान १३ मार्गदर्शन वर्ग,१ राज्यस्तरीय तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत जिल्हास्तरीय मार्गदर्शन वर्ग व १ जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षा यांचे नियोजन करण्यात आले आहे. या मार्गदर्शन वर्गामध्ये फक्त मराठी व सेमी इंग्लिश माध्यमाचे विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. हे वर्ग इंग्रजी माध्यमासाठी नाहीत. मार्गदर्शन वर्गामध्ये मराठी माध्यमातून मार्गदर्शन होईल. मार्गदर्शन वर्ग महिन्यातील किमान दोन रविवारी घेण्यात येतात. यात मार्गदर्शन वर्गासहीत घटकांवर आधारीत सराव प्रश्न, जिल्हास्तरीय सराव परीक्षा फी यांचा समावेश आहे. वर्षभरात अन्य कोणतीही फी आकारली जाणार नाही. मार्गदर्शन वर्गाची वेळ रविवारी सकाळी ९ ते १२ अशी असून ९ ते १०.३० व १०.३५ ते १२.०५ या वेळात दोन विषयांचे मार्गदर्शन होईल. गणित व बुध्दीमत्ता यांसह मराठी व इंग्रजीचेही मार्गदर्शन होईल. पूर्व उच्च प्राथमिक, (५ वी) व पूर्व माध्यमिक ( ८वी) साठी प्रत्येकी ५० विद्याथ्यांना प्रवेश मिळेल. शैक्षणिक मंडळाचे अनुभवी व तज्ज्ञ मार्गदर्शक तसेच जिल्हयातील तज्ज्ञ मार्गदर्शक यांचे मार्गदर्शन या वर्गातून विद्यार्थ्यांना मिळणार आहे. मार्गदर्शन वर्ग परमहंस भालचंद्र महाराज संस्थान नजीकच्या शाळा कणकवली क्र. ३ येथे होणार आहे. या मार्गदर्शन वर्गासाठी प्रवेश घेताना प्रवेश अर्ज भरून द्यावा लागेल, प्रवेश अर्जामध्ये विद्यार्थी माहितीसह वॉटसअँप नंबर, संपकांसाठी मोबाईल लँडलाईन नंबर, जन्मतारीख, पूर्ण पत्ता, विद्यार्थी व पालक सही आवश्यक असून त्यावर सदर विद्यार्थ्यांचा फोटो लावावा लागेल. प्रवेश अर्ज परमहंस भालचंद्र महाराज संस्थान येथे प्राप्त होतील. पूर्ण भरलेले प्रवेश अर्ज १६ जुलै२०२२ पासून संस्थान कार्यालयात स्विकारले जातील. प्रवेश फी पावती परीक्षेपर्यंत जपून ठेवावी. प्रवेश अर्ज. २४ जुलै २०२२ पर्यंतच स्विकारले जातील. या मार्गदर्शन वर्गाचा शुभारंभ रविवार २४ जुलै २०१२ रोजी सकाळी ९.३० वाजता परमहंस भालचंद्र महाराज संस्थान भक्तनिवास सभागृहात संपन्न होईल. शुभारंभानंतर गणित या विषयाचे स्वतंत्रपणे मार्गदर्शन होईल. त्याचवेळी पालकांसाठीही पूर्ण तयारी मार्गदर्शन वर्ग घेण्यात येणार आहे.
अधिक माहितीसह परमहंस भालचंद्र महाराज संस्थानचे व्यवस्थापक विजय केळुसकर (९४२१२३८९२५) शैक्षणिक मंडळ अध्यक्ष गजानन उपरकर व शैक्षणिक मंडळ सदस्यांशी संपर्क साधावा. या शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्गाचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष सुरेश कामत, सचिव अशोक सापळे, खजिनदार दादा नार्वेकर व शैक्षणिक मंडळाने केले आहे.