-शिवसेना नेते संदेश पारकर यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी
“उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन सर्व दोषींवर कारवाई होण्यासाठी दाद मागणार”
-संदेश पारकर आक्रमक
कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकानजीक शिवाजी महाराजांचा नविन पुतळा बसविण्यात आला व तेथील छत्रपतींचा जुना पुतळा बेकायेशीररीत्या हलविण्यात आला. हे दोन्ही प्रकार संशयास्पद आहेत. यात सहभागी असणाऱ्या पोलीस अधिकारी, न.पं. प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासन व न.पं.चे सत्ताधारी लोकप्रतिनिधी या सर्वांची खातेनिहाय चौकशी व्हावी व दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक यांच्याकडे पत्राद्वारे करण्यात आल्याची माहिती शिवसेना नेते संदेश पारकर यांनी दिली आहे.
घडल्या प्रकाराबाबत जिल्हाधिकारी कार्यालय, नगरपंचायत मुख्याधिकारी, पोलीस निरीक्षक यांच्याकडे माहितीच्या अधिकारात माहिती मागविण्यात आली आहे. जुना पुतळा हलविण्यामध्ये किती अधिकारी कर्मचारी सहभागी होते.?, या कारवाईसाठी पोलिसांना कुणी आदेश दिले होते.?, पुतळा हलविल्याची व नविन पुतळा बसविल्याची नोंद पोलिसांच्या दैनंदिन नोंदवहीत आहे का.?, नविन पुतळा कुणी बसविला आहे.?, अशी माहिती मागविण्यात आली आहे. माहिती प्राप्त होताच याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचेही संदेश पारकर यांनी म्हटले आहे.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाची माहिती देताना पारकर म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे श्री.अरूण पारकर यांच्या स्टेशनरी व झेरॉक्स सेंटर शेडच्या लगत स्व.विजय नाईक, अरूण पारकर व काही शिवप्रेमींनी ३५ वर्षांपूर्वी शिवपुतळा बसवला. त्यावेळी कोणतेही मंडळ अस्तित्वात नव्हते. पण दरवर्षी तेथे पुण्यतिथी तसेच शहरातील महत्वाच्या कार्यक्रमांवेळी पुतळ्याची सजावट केली जात असे. पण, महामार्ग चौपदरीकरणात पुतळ्याच्या पलिकडचीही जागा संपादीत झाली. त्यावेळी चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या दिलीप बिल्डकॉन कंपनी व हायवेचे तत्कालिन अधिकारी यांच्यातर्फे बाधित होत असलेला हा पुतळा गटारावर पुनर्स्थापित करण्याचा घाट घातला गेला. मात्र, माझ्यासह अनेक शिवप्रेमींनी हा प्रकार हाणून पाडला.
पुतळ्याबाबत नागरिकांनी लक्ष वेधल्यानंतर न. पं. सभागृहात तत्कालीन पालकमंत्री, आमदार वैभव नाईक व अन्य लोकप्रतिनिधी यांची बैठक झाली. यामध्ये शासकीय स्तरावर निधी उपलब्ध करून १८ ते २० गुंठे क्षेत्राच्या शासकीय जागेत बाधित पुतळ्याचे स्थलांतरण करण्याचे ठरले. त्यासाठी हायवेच्या बाजूला जि. प. च्या ताब्यातील आणि शासनाच्या मालकीची जागा सुचविण्यात आली. तर तेलीआळी रस्त्याच्या बाजूला २० गुंठे जागा असून त्यावरील अनधिकृत बांधकामे हटवून पुतळा पुनर्स्थापित करण्याचे ठरले.
मात्र, ७ जूलैच्या २०२२ पहाटे याच शिवपुतळ्याच्या बाजूला एका फॅब्रिकेशन शेडमध्ये अज्ञातांनी नविन पुतळा बसविल्याचे समजले. माहिती घेतली असता आमदार नीतेश राणे, कणकवली नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष त्यांचे काही कार्यकर्ते पुतळा बसविताना उपस्थित असल्याचे खात्रीशीर समजले आहे. हा गैरप्रकार सुरु असताना तेथे दाखल झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे यांना उपस्थितांकडून शिविगाळ करण्यात आली व तेथून निघून जाण्यासाठी धमकावले गेले.
नविन पुतळा बसविणाऱ्यांवर संबंधित खात्याने कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे पुतळा अज्ञाताने बसविला असे भासवून या बेकायदेशीर कृतींना सहाय्य केले जात असल्याचे स्पष्ट होत आहे, असेही जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणल्याचे पारकर यांनी म्हटले आहे. ९ जूलैच्या पहाटे नगरपंचायत प्रशासन, मुख्याधिकारी, तहसीलदार, प्रांताधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये पूर्वीचा पुतळा बेकायदेशीरपणे, शहरवासीयांच्या भावना विचारात न घेता, स्थलांतरणाची प्रक्रिया शासन स्तरावर सुरु असताना तेथून हलविण्यात आला.
पण, रातोरात बसविलेल्या नव्या पुतळ्याबाबत कोणतीही कारवाई महसूल , पोलीस , नगरपंचायत प्रशासनाने केलेली नाही . म्हणजेच अधिकृत पुतळ्यावर कारवाई करून अनधिकृत पुतळ्यास संरक्षण दिले गेले. यात सहभागी असणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल होणे आवश्यक असून संबंधित शासकीय अधिकारी यांची प्रशासकीय स्तरावर चौकशी व्हावी, अशी मागणी केल्याचेही पारकर यांनी म्हटले आहे.