You are currently viewing वारस (भाग ४)

वारस (भाग ४)

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री आसावरी इंगळे, (जामनगर) यांची अप्रतिम कथा

*वारस (भाग ४)*

शालूचे लग्न होऊन आता चार-पाच महिने होत आले होते. या दरम्यान तिची आणि कामिनीची एकदाही भेट झाली नव्हती.. ना ही कामिनीची मुलगी जुई तिच्या नजरेस पडली होती. याचं तिला बरेचदा आश्चर्य वाटायचं. तिच्याबद्दल राघोला काही विचारावं तर राघोचा मूड जायचा..त्याचा मूड तिच्यासाठी जास्त महत्वाचा होता. त्यामुळे त्याच्याजवळ विषय काढायचा नाही, असं तिने कटाक्षाने ठरवलं. घरात विचारावं असे विश्वासाचे कुणीच नव्हतं किंवा अजून त्यांच्याबद्दल विश्वास निर्माण व्हावा असं नातं तयार झालं नव्हतं.. तसंही ते सगळेच कमी म्हणजे कामापुरते बोलत असत. अशातच तिला मातृत्वाची चाहूल लागली. राघोला कळले तेव्हा राघोने सर्व नोकरांना मिठाईचे डब्बे वाटून आनंद साजरा केला. तिने कोणतेही काम करण्यास त्याने बंदी केली…तसंही तिला घरात काम नसेच. दिवसभर पुस्तक वाचायचं, आराम करायचा एवढेच काम तिच्याकडे होते. गाव तसं फार विकसित नव्हतं. त्यामुळे तिथे इंटरनेटची व्यवस्था फार चांगली नव्हती. फोनही लागायचा तर लागायचा, अशी परिस्थिती असायची. कॉलेजमध्ये असताना तिने आजूबाजूला चमचे गोळा केले असल्याने जीवाभावाच्या मैत्रिणीही कुणी नव्हत्या. घरच्यांनी संबंध तोडल्याने, तिथेही फोन उचलणारे कुणीच नव्हतं. त्यामुळे फोन नसल्याने तिचं फारसं बिघडत नसे. नाही म्हणायला एकदा तिने घरी फोन करून पाहिला होता पण तिचा आवाज ऐकताच त्यांनी फोन कट केला होता. आमची मुलगी आम्हाला मेली, असे स्पष्ट शब्दांत सांगून पुन्हा फोन न करण्याबद्दल बजावले होते. अख्ख्या जगात शालूला राघोशिवाय जवळचे असे कुणीच उरले नव्हते. त्याच्या मनमर्जीनुसार वागणे, त्याला जपणे तिची प्राथमिकता होती. तसा राघोही तिने मागितलेली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वस्तू आणून देत होता त्यामुळे त्याला दुखावण्याचा प्रसंगही तिच्यावर कधी आला नव्हता. शालूला तीन महिने होत आले होते. या तीन महिन्यात राघोने तिची इतकी काळजी घेतली होती की तिला कामिनीचा पूर्णपणे विसर पडला.

“आता तू जपायला हवं शालू.. आपल्या बाळासाठी!”, राघो तिला वारंवार सांगत असे. तीही जमेल तशी काळजी घेतच होती.

“शालू.. दुपारी आपल्याला डॉक्टरकडे जायचंय बरं का चेकअपला.. तयार रहा. मी येतोच ३ पर्यंत.”, राघोने बाहेर जाता जाता शालूला सुचना केली.

शालूनेही मान डोलावली. गावात २-३ डॉक्टर्स होते. त्यात स्त्रियांची डॉक्टर एकच होती. तिचं वागणं, बोलणं मधाळ होतं. रुग्णांना आपलेसे करणारे होतं. त्यामुळे तिच्याबद्दल गावात आदर होता. राघोने महिलांसाठी गावात आधुनिक मशिन्स असलेला दवाखाना आणल्याने राघोबद्दलही एक आदर होताच. इतर दोन्ही दवाखान्यांना देखील राघोने आर्थिक मदत पुरवली होती. त्यामुळे राघोचा शब्द डॉक्टर्सकरिता अंतिम शब्द असे. डॉक्टरकडे शालूची चांगलीच खातिरदारी झाली. डॉक्टर मेधाने मायेने तिची चौकशी केली. कुठलीशी एक तपासणी करताना मात्र त्यांच्या कपाळावर आठ्या आल्या. बाळाची वाढ थांबली होती. हे धोक्याचे चिन्ह होते. शालूच्या जीवावर बेतणारे होते. तिचा ताबडतोब गर्भपात करणे गरजेचे होते. द्विधा मनस्थितील राघोने शालूला परिस्थितीची जाणीव दिली. शालूच्या डोळ्यात पाणी आले.

 

“शालू..माझ्यासाठी तू महत्वाची. बाळ काय असेल नशिबात तर होईलच नं!”, राघोच्या आश्वासक शब्दांनी तिला बराच धीर आला. दुपारी आनंदी चेहऱ्याने गेलेली शालू सायंकाळी भकास चेहऱ्याने घरी आली.

*(क्रमशः)*

प्रतिक्रिया व्यक्त करा