*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच…. लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्य लेखक कवी दीपक पटेकर यांचा गुरुपौर्णिमेनिमित्त लिहिलेला अप्रतिम लेख*
*गुरुपौर्णिमा…..*
*गुरु म्हणजे माय बापं | नाम घेता हरतील पापं ||*
आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात….आपल्या पूज्य गुरूंना वंदन करण्याचा गुरू चरणी लिन होण्याचा हा दिवस…!
*फळले भाग्य माझे ! धन्य झालो संसारी !*
*सद्गुरू भेटले हो ! त्यांनी धरीयले करी !*
गुरुपौर्णिमा ही सद्गुरूंची पौर्णिमा मानली जाते… पौर्णिमा म्हणजे प्रकाश… गुरू हा ज्ञानाचा प्रकाश शिष्याला देतो आणि तो आपल्यापर्यंत पोहचावा म्हणून गुरूला वंदन करण्याचा हा दिवस म्हणजे “गुरुपौर्णिमा”.
आपल्या जीवनात आपले प्रथम गुरू म्हणजे आई-वडील…! आईच्या उदरात असल्यापासून आपल्यावर संस्कार करणारी…प्राणापेक्षा जपणारी आणि आपल्याला प्रिय असलेल्या उदरातील जीवास दृष्टीने न पाहतांही आपल्या प्रिय व्यक्तीस कशी जपावी हे नकळत शिकविणारी आपली आई हीच आपला पहिला गुरू…
अनंतकळा सोसून जिने हे सुंदर जग दाखविले… आणि आपल्याला कितीही त्रास झाला तरी त्या त्रास सोसण्याने दुजास आनंद देता येतो हे तिनेच शिकविले… आपल्या अंगावरील अमृत पाजून तिने लहानाचे मोठे केले आणि परोपकारी भावना आपल्या मध्ये निर्माण केली…बोबड्या बोलांना शुद्धतेत प्रमाणित केलं…असे निस्वार्थीपणे एक ना अनेक संस्कार आणि उपकार करणारी आपली आई आपला प्रथम गुरू…!
बालपणी धडपडत चालताना हाताच्या नाजूक बोटांना पकडून ज्यांनी धडपडलो तरी पुन्हा उठून निडरपणे चालायला शिकविले…स्वतः कष्ट करून आम्हांस भोजन दिले…स्वतः अर्थपोटी राहूनही आमच्या चेहऱ्यावरील आनंदाने स्वतःचे पोट भरले… परमार्थामध्येच आनंद असतो…अशी शिकवण देणारे…दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानायला शिकवणारे आपले वडील हे दुसरे गुरू….!
अक्षर ओळख नसताना…आपल्या ज्ञानाचा फायदा दुसर्यांना कसा होईल…त्यातून थोर, महान विभूती कशा घडतील याची सर्वतोपरी काळजी घेत ज्ञानाचे अखंड भांडार आपल्या शिष्यापुढे खुले करत ज्ञानामृत पाजणारे गुरुजन आपले तिसरे गुरू….अभ्यासाबरोबरच मुलांना ऐतिहासिक गोष्टी सांगून गोष्टींमधून महारथी महापराक्रमी तत्त्वनिष्ठ योद्धा कर्णा प्रमाणे जगायला शिकवणारे गुरुजन, शिक्षक लाभणे हे सुद्धा आपले परम भाग्यच…!
आपण कोणाचे तरी शिष्य आहोत या भावनेतच कृतज्ञता वाटते…
अवधुतांनी यदुराजाला उपदेश करताना सांगितले की,…
*जो जो जयाचा घेतला गुण ! तो म्यां गुरू केला जाण..!*
गुरुसी पडले अपारपण ! जग सगळे गुरू दिसे !
गुरू हा सद्गुण अंगिकरण्यासाठी, अवगुण त्यागण्यासाठी आणि ज्ञानप्राप्तीसाठी असतो…
ज्या ज्या व्यक्तींकडून आपण गुण प्राप्ती करतो तो तो आपला गुरू होय…!
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी ज्येष्ठ बंधू निवृत्तीनाथांना गुरू मानले होते, संत नामदेव साक्षात विठ्ठलाशी बोलत असत, परंतु त्यांचे गुरू विसोबा खेचर होते…भारतीय संस्कृतीमध्ये पूर्वम्पार गुरू-शिष्य परंपरा चालत आलेली असून, गुरूंना पूज्यनीय मानले आहे.
विश्वामित्र-राम, द्रोणाचार्य-अर्जुन, परशुराम-कर्ण अशा अनेक गुरू-शिष्य जोड्या आपण पाहिल्या आहेत. परंतु एकलव्याची गुरुनिष्ठा सर्वांनाच मस्तक नम्र करायला भाग पाडते.
*गुरू हा सुखाचा सागर ! गुरू हा प्रेमाचा आगर !*
*गुरू हा धैर्याचा डोंगर ! कदाकाळी डळमळेना !*
गुरू हा ज्ञानाचा सागर आहे… जलाशयात विपुल प्रमाणात पाणी आहे परंतु घागर भरण्यासाठी खाली वाकुनच घटाघाटाने भरावी लागते…म्हणजेच विनम्र झाल्याशिवाय पाणी मिळत नाही…अगदी त्याचप्रमाणे गुरुचरणी शिष्याने नम्र झाल्याशिवाय ज्ञान प्राप्ती होणार नाही. *गुरुबिन ज्ञान कहाँ से लावू?* हेच अखेर खरे आहे….!
मानव जीवनात मायारुपी भवसागरात तरून जायचे असेल तर सद्गुरूंची नितांत आवश्यकता आहे. सद्गुरुच आपल्याला मोक्षाप्रत नेतात…सद्गुरूंना आपल्याला शोधायला जावे लागत नाही तर ते आपोआपच आपल्या जीवनात येतात. त्यासाठी केवळ शिष्याची आध्यात्मिक तयारी असावी लागते.
*सद्गुरू वाचोनी सापडेना सोय ! धरावे ते पाय आधी आधी !*
एकदा का सद्गुरू अनुग्रह केला की सोडायचा नसतो. केवळ नामस्मरण करावे, सद्गुरुंच्या नामात प्रचंड शक्ती असते. त्यांच्याशी एकनिष्ठेने रहावे…एक गुरू, एक नाम असावे. त्यांच्या नामात भगवंत प्रेम असते. गुरुसेवा म्हणजे गुरू आज्ञेचे पालन करणे.
परंतु गुरू कोणाला म्हणावे? हे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे.
जिथे आपले समाधान होते, शंका संशय फिटतात, तेच गुरुप्रद म्हणावे.
*ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे ! त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे !*
*मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी ! तेथे सद्गुरू तुझे पाय दोन्ही !*
गुरुतत्व एकच असल्यामुळे सर्व सद्गुरुंमध्ये आपले गुरू आपल्याला पाहता आले पाहिजेत. जिथे गुरुक्षेत्र आहे तिथेच मोक्ष देणारी काशी, पंढरपूर आहे, हे सदैव ध्यानात ठेवावे…म्हणून तर आई-वडिलांची सेवा देखील सर्वश्रेष्ठ मानली गेली आहे…मातापित्याची सेवा सुखी संपन्न आयुष्य, आरोग्य देते.
सद्गुरू आपल्या जीवनाला दिशा देतात…आकार प्रदान करतात.
गुरूंच्या उपकारांनी आपले मन भरून येते तेव्हा गुरुप्रति असलेला आदरभाव व्यक्त करताना आपल्या मुखातून गुरूंच्या आदराप्रति श्लोक बाहेर पडतो…
*गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः।*
*गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः॥*
©[दीपि]
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६