जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री आसावरी इंगळे (जामनगर) लिखित कथा
वारस (भाग २)
हॉटेलमधील एका शानदार खोलीत शालूसमोर राघो बसला होता…सुन्न.. दोन्ही हातात डोकं घट्ट पकडून! सहा वर्षात राघो तसाच होता राजबिंडा. ..फक्त चेहऱ्यावर एक उदासी होती. दाढीचे खुंट वाढले होते. काही क्षण ती पाहतच राहिली. राघोनेच बोलायला सुरवात केली.
“मी चुकलो शालू…मी चुकलो..माझी निवड चुकली. कामिनी अतिशय लालची मुलगी आहे. तिला माझ्यापेक्षा माझ्या पैशात रस आहे. आपल्या ‘फिगर’ला जपण्यासाठी ती आई व्हायलादेखील तयार नव्हती. माझ्या हट्टापुढे फक्त एकदा तिने एका मुलीला जन्म दिला. पण तिचे दर्शनही मला होऊ देत नाही.”
“म्हणजे?”
“म्हणजे…ती तिसर्या मजल्यावर वेगळी राहते.”
“काय? पण का?..”
“माहित नाही शालू.. पण…तिने माझ्याशी संबंध तोडलेत.”
“संबंध तोडलेत…..?? तोडलेत..म्हणजे?””
“ती… ती मला जवळही येऊ देत नाही..”, तो खाली मान घालून बोलला.
“काय?” अतिशय आनंदाने शालूचे डोळे चमकले.
“तू काळजी करू नकोस.. मी आहे नं.. मी बोलेन तिच्याशी.”, तिने जाणीवपूर्वक त्याच्या हातावर हात ठेवला. आजपर्यंत जे ती कल्पनेत रंगवत होती, ते सत्यात उतरत होतं! आता बस त्याने आपल्याला प्रेमाची भीक मागावी आणि मग आपण त्याला जुने दिवस आठवून नकार देऊ.. मग तो रडेल.. शालू आपल्या स्वप्नात रंगली होती..
“त्याचा काही फायदा नाही शालू.. तुला तर ती तशीही पसंत करत नाही. मला खरंतर तूच जास्त आवडत होतीस..पण एक दिवस तिने मला तुझ्या नावाने आपल्या कॉलेजच्या मागे सायंकाळी उशिरा भेटायला ये, अशी चिठ्ठी पाठवली होती. मी अधीरपणे गेलो होतो. तिथे तूच आहेस समजून मी तिला जवळ घेतलं. तिने त्याचं खूप भांडवल केलं.. आणि मला तिच्याशी लग्न करायला भाग पाडलं!”
“काय.. पण हे मला का नाही सांगितलस?”
“माझी हिम्मत नाही झाली..” तो पुन्हा खाली मान घालून बोलला. म्हणजे राघोला आपण आवडत होतो पण कामिनीने मध्ये फांदी मारली होती.. कामिनी … कामिनी…. ही मध्ये कडमडली नसती तर राघो कधीचाच तिचा झाला असता… स्वार्थी कुठली! शालूच्या डोळ्यात क्षणभर अंगार फुलून आला..
“हं.. मग आता..माझ्याकडून काय अपेक्षा आहे?”
“मी…मी अगदी एकटा पडलोय गं..” त्याने रडवेल्या स्वरात शालूला मीठी मारली.. तशी शालू शहारली!
“तू काय ठरवलंस? सोडणार आहेस का तिला?”
“मी लाख सोडायला तयार आहे पण आमची गावात खूप प्रतिष्ठा आहे शालू. ही बातमी बाहेर पसरली तर गावात काय पत राहील आमची..तू समजू शकतेस..” तो तिला दूर करत म्हणाला.
“हं…”
“तिने स्वतःहून मला दुसरं लग्न करायची परवानगी दिली..फक्त ती घर सोडणार नाही, ही अट तिने घातली आहे..लालची..घर..संपत्ती..दुसरं काही नाही तिच्या जीवनात!”, तो चिडून म्हणाला.
“ओह..! मग काय करणार आहेस तू आता?”, कामिनीने दिलेला धक्का ऐकून शालूला मनातून आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या.. त्यात राघोची जवळीक… हेच तर स्वप्न ती रंगवत आली होती! शालूला स्वर्ग दोन बोटं उरला होता!
“मला एकटेपणाचा कंटाळा आलाय..पण कोण करणार माझ्याशी लग्न, पहिली पत्नी जीवंत असताना..ती मला सोडणार नसताना…”, तो पुन्हा हताश झाला.
“मी करेन तुझ्याशी लग्न राघो.. मी सुखात ठेवेन तुला..”
“खरंच?” त्याने भावनाविवश होऊन तिला पुन्हा मीठी मारली तसे शालूचे उरलेसुरले किंतुपरंतु त्यात विरघळून गेले.
*(क्रमशः)*