*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ ज्योत्स्ना तानवडे यांनी संत गोरा कुंभार यांच्या अभंगाचे केलेले रसग्रहण*
*|| अभंग ||*
निर्गुणाचा संग धरिला जो आवडी
तेणे केले देशोधडी आपणियासी ||१ ||
अनेकत्व नेले अनेकत्व नेले
एकले सांडिले निरंजनी ||२||
एकत्व पाहता अवघेचिं लटिके
जे पाहे तितुके रूप तुझे ||३||
म्हणे गोरा कुंभार ऐका नामदेव
तुम्हा आम्हा नाव कैचे कोण ||४||
संत गोरा कुंभार.
संत गोरोबा कुंभार यांनी आपल्या उच्च आध्यात्मिक अवस्थेचे वर्णन या अभंगात केलेले आहे. आपली ही अवस्था का आणि कशी झाली हे त्यांनी फार सुंदर रीतीने कथन केलेले आहे.
निर्गुणाचा संग, धरिला जो आवडी
तेणे केले देशोधडी, आपणालासी ||
एकदा निर्गुण-निराकार अशा परब्रह्माचा निदिध्यास लागला की, ध्यानी-मनी चिंतनी सदैव त्याचेच नाम, भजन, कीर्तन केले जाते. एका परमेश्वरा शिवाय अन्य कशाची जाणीव रहात नाही. मग या परमेश्वराने जणू आपल्याला देशोधडीला लावले असे वाटते. म्हणजे सामान्य माणसाला आत्मसाक्षात्काराची अवस्था प्राप्त होते. अशी आत्मज्ञानी अवस्था झाली की सगळीकडे परमेश्वरच दिसू लागतो. हीच अवस्था संत गोरोबांची पण झाली.
अनेकत्व नेले अनेकत्व नेले
एकले सांडिले, निरंजनी ||
अशी अवस्था प्राप्त झाल्यावर असे वाटते की, परमेश्वराने आपल्या आयुष्यातले अनेकत्वच नेले आहे. त्यामुळेच असे वाटतेय की, परमेश्वराने आपल्याला निर्जन वनात एकटे सोडले आहे. त्याचे कारणही हेच आहे की, सगळीकडे परमेश्वरच दिसू लागल्यावर आजूबाजूला लोक आहेत पण त्यांच्यातही परमेश्वर दिसतो आणि असे वाटते आपण निर्जन वनात एकटे आहोत. एकदा विष्णुमय जग दिसू लागले की सर्वत्र फक्त परमेश्वरच भरलेला आणि त्यात एकटे आपण हीच भावना उरते.
एकत्व पहाता अवघेचि लटके
जे पाहे तितुके, रूप तुझे ||
असा परमेश्वर सगळीकडे दिसू लागल्यावर, सगळीकडे जी विविध रूपे आहेत ती सर्व खोटी वाटू लागली आहेत. कारण समोर जे जे रूप पहातोय त्याच्यात परमेश्वरच दिसतो आहे अशी त्यांची अवस्था झाली आहे. याचा अनुभव पंढरीच्या वारीमधे येतो. वारीत लहान थोर सर्वजण विठ्ठलमय भासतात. त्यामुळे लहान मोठा प्रत्येकजण एकमेकांना वाकून नमस्कार करतात.
जे जे भेटे भूत
ते ते मानी भगवंत ||
याचा अनुभव घेत ऊराऊरी भेटतात. एवढा प्रचंड जनसागर भक्तीभावाने उचंबळून येतो.
म्हणे गोरा कुंभार ऐका नामदेव
तुम्हा आम्हा नाव, कैचे कोण ?
हे नामदेवा आपण दोघेही या रूपात सामावलो आहोत. त्यामुळे आपण कोण? आपले नाव काय? याला काहीच अर्थ नाही. संत गोरोबा, संत नामदेव परमेश्वराशी तादात्म्य पावल्याने त्यांना सर्वत्र परमेश्वरच भरून राहिलेला दिसतो आणि या परम अनुभूतीत ते रंगून जातात.
ज्याला ईश्वर भक्तीचा छंद जडतो तो सदैव त्याच नादान रंगून जातो. जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी त्याला परमेश्वराचेच रूप दिसते. आपली नित्यकर्मे करतानाही तो नाम संकीर्तनात इतका गुंग होऊन जातो की, त्याला चराचराचेही भान उरत नाही.
देवाशी पूर्ण तादात्म्य पावल्यावरच अशी उन्मनी अवस्था प्राप्त होते. संत चरित्रांमधून अशा अनेक घटनांचे वर्णन आलेले आहे. चिखल तुडवीत असताना भजनात रंगलेल्या संत गोरोबांची कथाही सर्वश्रुतच आहे.
परमेश्वराचा असा निदिध्यास लागला की मन भक्तीरसाने भरून जाते. मनात सद्विचारांची रुजवण होते. वाईट गोष्टींचा निचरा होऊन मन शुद्ध होते. सर्वत्र आनंदाची समाधानाची अनुभूती येते. अशावेळी अवघे जग हे विठ्ठलमय भासू लागते. अशा अनुभूतीचा लाभ घडू दे हीच माऊलींच्या चरणी प्रार्थना.
ज्योत्स्ना तानवडे. पुणे