*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य सावित्रीबाई फुले साहित्यभूषण राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त लेखक कवी जयराम धोंगडे यांची अप्रतिम गझल*
अतिवृष्टी
*वृत्त: महानाग*
*लगावली: लगागाx८*
कुठे मी म्हणालो बरस एवढा तू , धुरे बांध सारे कशाला मिटवले?
उभे पीक गेले गुरे दावणीची, मती गुंग झाली असे का उठवले?
तुझा खेळ होतो घडी दो घडीचा, किती कोसळावे मला सांगना तू?
नद्या काय नाले धरण तुंबले ते, जलाने जलाला कसे ते पचवले?
कुठे कोरड्याची नसे एक जागा, उरी काळजाला तडा खोल गेला!
बघा आसवांना जरा न्याहळा त्या, नसे मीठपाणी रुधिर बघ रिचवले!
किती निर्दयी तो कसा पावसाळा, लळ्याचा असा का गळा कापतो तो?
कधी देत झोला उगा अंत पाही, ठगासारखे का जगाला फसवले?
कशाला उतावे खऱ्या माणसाने, असे मातणे का तया साहवेना?
रहावे गुणाने वसा हाच पाळा, मला वाटते या धड्याला शिकवले!
® जयराम धोंगडे, नांदेड (९४२२५५३३६९)