You are currently viewing ती

ती

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य कोरोनायन, जय भोले, शब्दाटकी अशा विविध काव्यसंग्रहाचे लेखक कवी जयराम धोंगडे यांची अप्रतिम गझल

केल्यावरी इशारा ती बावरून गेली,
दाटून मेघ आले अन् मोहरून गेली!

तापून तप्त झाली कोरड तिच्या घशाला,
उन्हास साहतांना, ती भेदरून गेली!

वैशाख पेटलेला जावा सरून आता,
भेगाळल्या जिवाची, कांती विरून गेली!

जेष्ठातल्या मृगाचा संदेश काय आला,
शृंगारली खुबीने अन् गांगरून गेली!

आषाढ श्रावणाचा अन् जोश भादव्याचा,
प्रेमात पावसाच्या, ती पाझरून गेली!

गेला मुरून पुरता तो खोल मग तळाशी,
कायाच त्या धरेची, अंग निखरून गेली!

मी खेळ पाहतो हा दरसाल तो नव्याने,
प्रणयात आगळ्या या, सृष्टी तरून गेली!

जयराम धोंगडे, नांदेड ®

प्रतिक्रिया व्यक्त करा