सावंतवाडी :
सावंतवाडी तालुक्यातील कोंडुरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आजगाव कोंडूरे या शाळेने बळीराजासाठी एक दिवस या उपक्रमांतर्गत बांधावरची शाळा हा उपक्रम राबविला. मुलांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन शेतीविषयक माहिती घेत शेतातील विविध कामांचा आनंद लुटला.
बळीराजाबद्धल विध्यार्थ्यांच्या मनात आदर निर्माण व्हावा, शेती विषयी माहिती मिळावी, शेतीचे महत्व, बी बियाण, शेतीची अवजारे, खते, कीटकनाशके ह्या गोष्टींचा परिचय व्हावा या हेतूने जिल्हा परिषद सिंधुदुर्ग च्या वतीने बळीराजासाठी एक दिवस हा उपक्रम जिल्ह्यातील सर्व शाळा मध्ये राबविला जातो.
सावंतवाडी तालुक्यात ठीकठिकाणी जिल्हा परिषद शाळांमध्ये हा उपक्रम राबविला जात आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आजगाव कोंडूरे या शाळेने सुद्धा या उपक्रमात सहभाग घेतला. कोंडूरे येथे झालेल्या या उपक्रमात शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, पालक सर्वांनी शेतीत जाऊन, एक दिवस बळीराजासाठी उपक्रमात सहभाग घेतला.
यावेळी मळेवाड कोंडूरे ग्रामपंचायत सदस्य अर्जुन मुळीक, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सुमन मुळीक यांनी मुलांना शेतीविषयी माहिती देत, शेती अवजारांची प्रात्यक्षिक दाखवत, शेतीची माहिती दिली. यावेळी त्यांनी तरवा काढणी, लावणी, प्रात्यक्षिक करून शेतीचा आनंद घेतला. मुल सुद्धा शेतीच्या कामात रमलेली दिसून आली.
या उपक्रमावेळी शाळेच्या शिक्षिका श्वेता पांढरे, ग्रामपंचायत सदस्य अर्जुन मुळीक, कविता शेगडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुमन मुळीक, पालक अशोक मुळीक, भाग्यश्री मडूरकर, रेश्मा मुळीक, अनुसया मुळीक, पुंडलिक सावंत, अरविंद मडूरकर, प्रसाद मडूरकर, ज्ञानेश्वर तुळसकर, विद्यार्थी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना ग्रामपंचायत सदस्य अर्जुन मुळीक यांनी खाऊचे वाटप केले.