१० जूलैला होणार पदग्रहण; विविध उपक्रम राबविण्यासाठी माजगाव गाव दत्तक घेणार…
सावंतवाडी
येथील रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी डॉ. विनया बाड यांना संधी देण्यात आली आहे. सावंतवाडी क्लबच्या इतिहासात प्रथमच महिलेला सन्मान देण्यात आला आहे. त्या आपला पदभार १० जूलैला स्वीकारणार आहेत. दरम्यान यावर्षी विविध उपक्रम राबविण्याचा आपला मानस आहे. त्यासाठी माजगाव गाव दत्तक घेण्यात येणार आहे. तसेच तालुक्यातील अन्य लहान मुले, महिलांना सुध्दा उपक्रमात सहभागी करुन घेण्यात येणार आहे, असे डॉ. बाड यांनी सांगितले.
पदग्रहण समारंभाबाबत माहिती देण्यासाठी आज येथे रोटरी ट्रस्टच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी मावळते अध्यक्ष साई हवालदार यांनी आपल्या काळात झालेल्या विविध उपक्रमाकांची माहिती दिली. यावेळी प्रमोद भागवत, दत्तात्रय म्हापसेकर, राजू पनवेलकर, वल्लभ नेवगी, आनंद रासम आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. बाड म्हणाल्या, यावर्षी अनेक उपक्रम राबविण्याचा आमचा मानस आहे. सात गोष्टी फोकस करुन हे उपक्रम राबविण्यात येणार आहे. श्रवणयंत्रे वाटप तसेच डोळ्यांची तपासणी करुन संबधित रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया, कॅन्सर निदान शिबीर, मधुमेह तसेच एच.बी तपासणी अशा शिबिरासोबत सर्वांना शुध्द पाणी मिळावे यासाठी जनजागृती मोहीम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.