मालवण :
अर्धवट स्थितीतील गटार खोदाईमुळे मालवण शहरवासीयांना त्रास सहन करावा लागत असल्याने आ.वैभव नाईक यांनी याची गंभीर दखल घेतली. नगरपालिका प्रशासक तथा मुख्याधिकारी संतोष जिरगे यांना सूचना केल्या.
मालवण शहरातील गटार खोदाईचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. यामुळे पालिकेतील विरोधी पक्ष असलेल्या भाजपा कडून नाराजी व्यक्त केली जात असतानाच स्थानिक शिवसेना नेते, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांनी दोन दिवसांपूर्वी स्वतः रस्त्यावर उतरून साचलेल्या पाण्याला वाट मोकळी करून दिली होती. यावेळी मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यपद्धती बाबत देखील नाराजी व्यक्त करून त्यांची तक्रार आ. वैभव नाईक यांच्याकडे करणार असल्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांनी आ. वैभव नाईक यांचे मालवण शहरातील अपूर्ण गटार खोदाईकडे लक्ष वेधल्यानंतर आ. नाईक यांनी मालवण शहराला भेट देऊन येथील परिस्थितीची पाहणी केली.
यावेळी गटार खोदाईचा ठेका घेऊनही काम रखडून ठेवणाऱ्या ठेकेदारावर कारवाई झालीच पाहिजे. तसेच शहरात रखडलेली गटार खोदाई प्रशासनाने पूर्ण करून घ्यावी. असे आ. नाईक यांनी मुख्याधिकारी यांना सांगितले.
यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी बांधकाम सभापती यतीन खोत, संमेश परब, किरण वाळके, महेंद्र म्हाडगूत, तपस्वी मयेकर, प्रसाद आडवणकर, स्वप्निल आचरेकर, बाळू नाटेकर, सिद्धार्थ जाधव, मनोज मोंडकर यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, यतीन खोत यांनीही गटार खोदाई कामाबाबत ठेकेदार व प्रशासनाच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली. वारंवार सांगूनही योग्य पद्धतीने काम झाले नाही. मात्र ४ लाख पेक्षा जास्त बिल प्रशासनाकडून ठेकेदाराला देण्यात आले. याबाबत तक्रार आ.नाईक यांच्याकडे करण्यात आली. याची दखल घेत आ. नाईक यांनी संबंधित ठेकेदारावर फौजदारी कारवाई व्हावी तसेच ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी भूमिका प्रशासनाकडे मांडली.