मोफत आरोग्य , नेत्रतपासणी, रक्तदान शिबिराचे आयोजन
कणकवली
ब्राम्हणेश्वर शैक्षणिक सामाजिक उन्नती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै.नामदेव राजाराम मराठे यांच्या पुतळ्याचे अनावरण फोंडाघाट येथील संस्थेच्या शैक्षणिक संकुलात 8 जुलै रोजी सकाळी 9 वाजता करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध मोफत आरोग्य शिबिराचे, नेत्रतपासणी शिबीर तसेच रक्तदान शिबीराचे आयोजन कै.राजाराम मराठे कृषी महाविद्यालय येथे करण्यात आले आहे. मोफत आरोग्य शिबिरात हृदयविकार तपासणी, मूत्र व किडनी विकार, हाडाचे विकार, कॅन्सर तपासणी, ईसीजी, रक्तातील साखर, BMI आदी तपासण्या मोफत केल्या जाणार आहेत. कै. नामदेव मराठे यांनी ब्राम्हणेश्वर शैक्षणिक सामाजिक उन्नती मंडळाची स्थापना करून फोंडाघाट च्या माळरानावर कृषिनंदनवन फुलविले. अत्यंत कष्टातून आणि मेहनतीने त्यांनी फोंडाघाट येथे सायन्स ज्युनिअर कॉलेज, कृषी पदविका, कृषी महाविद्यालय, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ चे विविध शैक्षणिक कोर्स सुरू केले. कै. राजाराम मराठे काजू प्रक्रिया उद्योग उभारून घोणसरी सह लगतच्या गावातील गरजूना रोजगार मिळवून दिला. रचना कॉम्प्युटर्सच्या माध्यमातून फोंडाघाट पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना अद्ययावत संगणक शिक्षण उपलब्ध करून दिले. कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून केवळ फोंडाघाट दशक्रोशीच नव्हे तर सिंधुदुर्गसह अवघ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना कृषी शिक्षणाची कवाडे खुली करून दिली. आपल्या घोणसरी गावात मोफत वाचनालय सुरू केले. अनेक मंदिरे, ग्रामदैवत मंदिरांना सढळ हस्ते आर्थिक मदत केली. नामदेव मराठे यांच्या गतवर्षी झालेल्या अकाली निधनाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दानशूर व्यक्तीमत्व हरपले आहे.कै.नामदेव मराठे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 8 जुलै रोजी त्यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. याप्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थाध्यक्ष दीपेश नामदेव मराठे यांनी केले आहे.