वेंगुर्ले
वेंगुर्ले तालुक्यात आज सकाळपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. ठिकठिकाणी नदी ओहोळ दुथडी भरून वाहत आहेत, हे पाणी रस्त्यावर येऊन काहि ठिकाणी घरामध्ये घुसल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. पॉवर हाऊस नजीक तांडेल कुटुंबीय यांचे आंब्याचे झाड रस्त्यावर पडून या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. तर या पावसामुळे तालुक्यात सुमारे २ लाख ५ हजार ४०० रुपयांचे नुकसान झाले आहे, अशी महिती तहसील आपत्ती कक्षाकडून आज देण्यात आली.
वेंगुर्ला तालुक्यात आज सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. यामुळे ग्रामीण भागासहित शहरात ठीकठिकाणी खाडी, नदी, ओहोळांच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
तर शेतमळ्यात पाणी साचून राहिल्याने शेतीची कामेही ठप्प झाली होती. दरम्यान तालुक्यात होडावडा- तळवडे नदीवर पाणी आल्याने या पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली होती. तर सायंकाळ पर्यंत वेंगुर्ला डेपोतून एस टी बस सेवा होडावडा पर्यंतच सुरू ठेवण्यात आली असल्याची माहिती वेंगुर्ले एसटी आगाराकडून देण्यात आली. होती.
या मुसळधार पावसामुळे शहरातील कॅम्प परिसरात गटारांचे पाणी रस्त्यावर आले होते. पॉवरहाऊस येथील चौकात चारही बाजूनी गटाराचे पाणी रस्त्यावर आल्याने येथील शिरोडकर यांच्या दुकानात पाणी शिरले. तर कॅम्प परिसरात पॉवर हाऊस नजीक तांडेल कुटुंबीय यांचे आंब्याचे झाड रस्त्यावर पडून वाहतूक ठप्प झाली होती. वेंगुर्ले नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी हे झाड बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.
वेंगुर्ले तहसील आपत्ती विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार वेंगुर्ले शहरातील पाटीलवाडा येथील जिवाजी कृष्णा सुतार यांची घराची भिंत व छप्पर पडून सुमारे ३३ हजारांचे नुकसान झाले. तर मठ गावठणवाडी ते स्वयंभु मंदिरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुला नजीकचा रस्ता कोसळल्याने सिद्धार्थ नगर व परबवाडा जाणाऱ्या लोकांसाठी फक्त दुचाकीसाठी वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती. आडेली भंडारवडी येथील सुलोचना विश्वनाथ मुंडये यांच्या घराची भिंत पडून सुमारे ३५ हजारांचे नुकसान झाले. केळुस – कालवी मधील दाडोबा देवस्थान कडील रस्ता खचल्याने वाहतूक बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशी माहिती तहसील आपत्ती विभागाकडून देण्यात आली.