*मराठी बालभारती, थीम सॉंग, शॉर्टफिल्म आदींसाठी काव्यलेखन करणाऱ्या लेखिका कवयित्री सौ.सुनंदा भावसार, नंदूरबार यांची अप्रतिम काव्यरचना*
जे तुझे नव्हतेच ते घ्यावे कशाला माणसा
पाखरांच्या मालकीचे प्रांत केले खालसा
फक्त पारा लावल्याने होत नाही आरसा
काच म्हणते हा विचारच होत नाही फारसा
मागचे सांगून गेले तेच आम्ही मानतो
‘ह्या निसर्गाला जपावे’ का विसरलो वारसा?
लाभले गुणधर्म न्यारे ते हिरे बनलेत पण
दोष की दुर्भाग्य त्याचे राहिला जो कोळसा
बी-बियाणे कौतुकाने पाहते मी नेहमी
हा निसर्गानेच जपला केवढा मोठा वसा
जन्मल्यापासून ज्याच्या सोबतीने चाललो
त्याच श्वासांचा कुणीही देत नाही भरवसा
सोबतीला सूज्ञ असता काळजी मी का करू?
तू बघत जा ना सुनंदा मार्गदर्शक कवडसा
©®सौ.सुनंदा सुहास भावसार
१९-०५-२०२२ गुरूवार