*माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दीपक केसरकर यांच्या प्रवक्तेपदावर स्तुती सुमने*
महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवं वळण घेऊन शिवसेनेतून बंड करून बाहेर पडलेले एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि “मी पुन्हा येईन” असं ठासून सांगणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पक्ष आदेश पाळून महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. महाराष्ट्रात शिवसेना शिंदेगट आणि भाजपचे मिळून युतीचे सरकार स्थापन झाले. रविवारी ३ जुलैला नव्याने स्थापन झालेल्या मंत्रिमंडळाची अग्निपरीक्षाच होती. महाराष्ट्राच्या विधानसभेचे नवे अध्यक्ष कोण होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून होते. विधानसभा अध्यक्षपदासाठी शिंदे गट व भाजपकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून राजापूरचे आमदार राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात आली होती. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये मूळचे सावंतवाडीचे असलेले राहुल नार्वेकर यांना १६४ मते, राजन साळवी यांना १०७ मते पडली आणि राहुल नाईक विजयी झाले. विधानसभा अध्यक्ष पद निवडणुकीत अबू आजमी सहित एमआयएम मिळून तीन सदस्य तटस्थ राहिले तर काँग्रेस राष्ट्रवादीचे काही सदस्य अनुपस्थित राहिले.
विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड झाल्यानंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अध्यक्षांचे अभिनंदनपर भाषण करताना शिंदे गटाकडून गेले जवळपास पंधरा दिवस प्रवक्ते म्हणून अतिशय शांत संयमी व अभ्यासू वक्तृत्वाने महाराष्ट्राच्या राजकारणात आपली एक वेगळीच ओळख निर्माण केलेले आणि२००९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस कडून सावंतवाडी मतदारसंघात भरघोस मतांनी निवडून आलेले आमदार दीपक केसरकर यांची स्तुती केली. “आमदार दीपक केसरकर हे राष्ट्रवादीकडे शिकलेले वाया गेले नाही” असे म्हणताच संपूर्ण सभागृहात एकच हशा पिकला. आमदार दीपक केसरकर हे पहिल्यांदा विधानसभेत निवडून गेले ते राष्ट्रवादी पक्षाकडूनच. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर असलेल्या प्रेमामुळे आमदार दीपक केसरकर यांनी काँग्रेस पक्षातून राष्ट्रवादीची निर्मिती झाल्यावर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. परंतु विधानसभेच्या तिकीट वाटपाच्या वेळी राष्ट्रवादीकडून उमेदवारी फायनल होताना केसरकर यांना तारेवरची कसरत करावी लागली. दीपक केसरकर यांनी तन-मन धन अर्पून राष्ट्रवादी जिल्ह्यात वाढवली होती व पक्षामध्ये सुसंस्कृतपणा जपला होता. मराठा समाजाचे असलेले माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांना गोंजारले गेले, पण राष्ट्रवादीला दीपक केसरकर यांना जपता आले नाही. परिणामी दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेचा मार्ग धरला होता. कदाचित राष्ट्रवादीतून शिवसेनेत जाऊन मंत्री झालेले दीपक केसरकर यांना त्यावेळी राष्ट्रवादीने जपलं नाही याचे शल्य आता अजित पवार यांना वाटू लागले आहे. केसरकरांच्या हुशारीची संधी राष्ट्रवादीला देखील घेता आली नाही. केसरकरांनी राष्ट्रवादीत असताना सावंतवाडी नगरपालिका विरोधकांना नेस्तनाभूत करत १७/० फरकाने एकहाती जिंकून दिली होती.
शिवसेनेकडून गृहराज्यमंत्री म्हणून काम केलेले दीपक केसरकर यांच्या ज्ञानाचा आणि अभ्यासूवृत्तीचा वापर शिवसेनेला देखील करता आलेला नाही. दीपक केसरकर यांच्या विरोधात जिल्ह्यातून पक्षातीलच काही केसरकर विरोधकांनी पक्षश्रेष्ठींचे कान भरल्यामुळे केसरकर गेली दोन वर्षे आमदार असूनही दुर्लक्षितच राहिले. शिवसेनेचे विधानसभेतील गटनेते एकनाथ शिंदे यांनी दीपक केसरकर यांच्यातील अभ्यासवृत्ती व शांत संयमी बोलणे आणि त्यांची विधानसभा कामकाजातील हुशारी ओळखून त्यांची शिवसेनेच्या शिंदे गटाच्या प्रवक्तेपदी निवड केली. आपल्या निवडीचे सोने करताना दीपक केसरकर यांनी महाराष्ट्रालाच नव्हे तर देशातही एखाद्या पक्षाचा प्रवक्ता कसा असावा याचे उत्तम उदाहरण समोर ठेवले. आम.दीपक केसरकरांच्या वक्तृत्वशैलीवर अनेकांनी स्तुतीसुमने उधळली, कौतुक केले अगदी अजितदादा पवार देखील मागे राहिले नाहीत हे देखील आज दिसून आले.