आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात जयंती साजरी…
वैभववाडी
भारताच्या इतिहासात होऊन गेलेल्या पराक्रमी आणि स्वाभिमानी राजांमध्ये महाराणा प्रतापसिंह यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. सोळाव्या शतकात राजस्थानातील मेवाड भुमीच्या सर्वांगीण रक्षणासाठी प्रयत्न करणारा एक थोर राजा म्हणजे महाराणा प्रतापसिंह होय. सुख आणि ऐश्वर्य बाजूला सारून शेवटच्या श्वासापर्यंत मुघल सत्तेशी संघर्ष करून आपले राज्य आबादीत ठेवले. अशा थोर राष्ट्रपुरुषाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जीवनात वाटचाल केली पाहिजे, असे प्रतिपादन महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे सहसचिव शैलेंद्र रावराणे यांनी केले.
वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था संचलित आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील सांस्कृतिक व इतिहास विभागाच्यावतीने महाराणा प्रतापसिंह जयंती कार्यक्रम प्राचार्य डॉ.सी.एस.काकडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सहसचिव शैलेंद्र रावराणे, खजिनदार अर्जुन रावराणे, स्थानिक समिती अध्यक्ष सज्जन काका रावराणे, सचिव प्रमोद रावराणे, उपप्राचार्य प्रा.ए.एम.कांबळे, कार्यालयीन अधीक्षक संजय रावराणे, प्रमुख वक्ते प्रा.एस.एन. पाटील व सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.डी.एस.बेटकर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाराणा प्रतापसिंह प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.
महाविद्यालयातील सिद्धिविनायक पुस्तकपेढी योजनेअंतर्गत प्रथम वर्षामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुस्तक संचाचे वाटप करण्यात आले.
महाराणा प्रतापसिंह यांचा पराक्रम आणि स्वाभिमान पाहता त्यांचे इतिहासातील स्थान सर्वोच्च स्थानी आहे. त्यांनी आपल्या मेवाड प्रांतात सर्वसामान्य जनतेमध्ये निर्माण केलेली स्वातंत्र्याची प्रेरणा तसेच त्यांनी राबविलेली कृषिनीती महत्त्वपूर्ण होती. मेवाड मधील प्रत्येक व्यक्ती प्रथम सैनिक नंतर शेतकरी, व्यापारी आणि कामगार आहे. त्यांनी कृषीनीतीच्या माध्यमातून शेती, उद्योग, व्यापार आणि जल व्यवस्थापनाच्या सोयी निर्माण करुन अन्न धान्याच्या उत्पादनावर भर दिला होता. शेतकऱ्यांना लागणारे बैल, बी बियाणे, आर्थिक साहाय्य पुरवून मेवाडला स्वयंपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्न केले. महाराणा प्रतापांच्या राजकीय पराक्रमाइतकेच त्यांची कृषिनीती आदर्शवत होती असे प्रमुख वक्ते प्रा.एस.एन पाटील यांनी सांगितले.
महाराणा प्रतापसिंह एक आदर्श व्यक्तिमत्व होते. त्यांच्या पराक्रमाच्या गाथा आजही गायल्या जातात. त्यांच्या जीवनकार्याचा अभ्यास करून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी, असे संस्थेचे खजिनदार अर्जुन रावराणे यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
महाविद्यालयामध्ये विविध महापुरुषांच्या जयंती व इतर कार्यक्रमांचे आयोजन करुन त्यांचे विचार व कार्य पोहोचवण्याचे काम केले जाते. विद्यार्थ्यांनी महाराणा प्रतापसिंह या पराक्रमी महापुरुषाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल केल्यास जीवनात यशस्वी होण्याची प्रेरणा मिळेल, असे अध्यक्ष भाषणात प्राचार्य डॉ.सी.एस.काकडे यांनी सांगितले.
यावेळी सज्जन काका रावराणे यांनी महाराणा प्रतापसिंह यांना अभिवादन करून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयातील कु.सिद्धी नारकर व कु.पूजा साखरपेकर यांनी महाराणा प्रतापसिंह जयंती निमित्त मनोगते व्यक्त केली.
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.डी.एस.बेटकर यांनी केले तर प्रा.डॉ.एम.आय. कुंभार यांनी आभार मानले. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.