You are currently viewing सत्तेच्या सारीपटावरची राजे आणि प्यादी

सत्तेच्या सारीपटावरची राजे आणि प्यादी

सत्तेच्या सारीपटावरची राजे आणि प्यादी

महाराष्ट्रातील सत्तेच्या राजकारणात नक्की विजय कोणाचा झाला?
शिवसेना चितपट झाली? की शिंदे जिंकले?
भाजपा ने बाजी मारली? की फडणवीस हरले?
काँग्रेस संपली? की पवारांची बाजी पालटली? ना प्रश्न उरले ना उत्तरं मिळाली परंतु अनपेक्षितपणे राजकारणाची “ऐशी की तैशी” झाली

विशेष संपादकीय…..

महाराष्ट्राच्या राजकारणात एकापेक्षा एक धक्के सर्वानाच बसले आणि या धक्क्यांमधून कोण सावरलं? कोण मोडलं? कोण तरलं? हे येणाऱ्या दिवसात दिसून येईल, परंतु एकंदरीत राजकारणाची दिशा पाहता सत्तेसाठी हापापलेले राजकारणी मात्र लांडग्यांनाही मागे टाकून गेलेले दिसले. महाविकास आघाडी करून शिवसेना नेतृत्वाने अडीज वर्षे पहिला मुख्यमंत्री आमचा अशी सर्वप्रथम भाजपा समोर ठेवलेली अट महाविकास आघाडीच्या माध्यमातून पूर्ण करून घेतली. परंतु मुख्यमंत्री शिवसेनेचा असला तरी सर्व सत्तास्थाने आपल्याकडे ठेवत देशातील मुरब्बी राजकारणी म्हणून ओळख असणाऱ्या पवारांनी सत्तेचा पुरेपूर लाभ घेतला. राज्यात सर्वात मागे पडलेल्या काँग्रेस पक्षालाही सत्तेतून संजीवनी मिळाली. परंतु सत्ता असूनही शिवसेनेची मात्र पीछेहाट झाली. एवढेच कमी की काय तर शिवसेनेचे ९०% आमदार, मंत्री गट दुभंगला गेला आणि शिवसेनेसारखा बाळासाहेबांच्या ज्वलंत विचारांवर चालणारा पक्ष फुटला.
हिंदुत्वाचे कट्टर समर्थक म्हणून एकनाथ शिंदे यांनी बंड करून राष्ट्रवादी व कॉंग्रेससारख्या सेक्युलर पक्षांशी आघाडी नकोच म्हणत हिंदुत्ववादी समविचारी भाजपा सोबत सरकार स्थापन करू अशी अट शिवसेनाप्रमुखांसमोर ठेवत वेगळा मार्ग चोखळला. यापूर्वी शिवसेनेत चार पाचवेळा बंड झाली होती, परंतु ती तेवढी सफल झाली नाहीत, बंड करणारे राजकारणात यशाच्या कसोटीवर मागेच पडले. छगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे, गणेश नाईक अशी काही धुरंदर माणसे आज स्वतःचं अस्तित्व टिकविण्यासाठी धडपड करत आहेत. या सर्व बंडाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांचे बंड मात्र शिवसेनेला पोखरून गेले. तब्बल चाळीस आमदार, मंत्री या बंडात सामील झाले, परंतु त्यांनी स्वपक्षाच्या, शिवसेना नेतृत्वाच्या विरोधात बंड केले नसून राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नीतीच्या विरोधात बंड केले आहे. राष्ट्रवादी पक्षाकडून शिवसेना संपविण्याचा घाट घातल्याचे दिसून येत असल्याने शिवसेनेचा एक मोठा गट बाहेर पडला.
महाराष्ट्रात भाजपा आणि शिवसेना एकत्र राहिले तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस डोकं वर काढू शकणार नव्हती. सत्तेच्या बाहेर राहिलो तर पक्ष वाचविणे कठीण होईल ही अटकळ बांधून पवारांनी विधानसभेच्या निवडणुकीनंतर शिवसेनेला संजय राऊत यांच्या मार्फत जवळ ओढले, अजिबात आढेवेढे न घेता मुख्यमंत्री पद शिवसेनेला दिले, परंतु उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत अशी अट घातली. कारण शिवसेनेकडे राऊत, देसाई, नार्वेकर हेच पक्षाची धुरा सांभाळत होते, ठाकरे केवळ रिमोट कंट्रोल वापरून पक्ष संघटना एकत्र ठेवत होते, त्यांना प्रशासकीय ज्ञान नव्हते, त्यामुळे ठाकरे मुख्यमंत्री झाले तर सरकारची धुरा आपल्या हातात राहील हे जाणून पवारांनी ठाकरेंना मोठेपणा दिला आणि पद्धतशीरपणे शिवसेना संपविण्याचा घाट घातला. ठाकरे मुख्यमंत्री असल्याने महाराष्ट्रात झालेले पालघर कांड, बांद्रा कांड, वाधवन प्रकरण आदी सर्व मुख्यमंत्री म्हणून ठाकरेंवर शेकली, विरोधकांनी प्रकरणे धगधगत ठेवल्याने बदनामी शिवसेनेची झाली. त्यामुळे राज्यात शिवसेना हळूहळू तुटत गेली. हिंदुत्वाचा शिवसेनेचा चेहरा लोकांच्या मनात मलिन होत गेला आणि बाळासाहेबांनी अत्यंत कष्टाने, आपल्या ज्वलंत विचारांनी उभारलेली संघटना पोखरली गेली.
पवारांनी पद्धतशीरपणे राज्यात राष्ट्रवादी वाढविण्यासाठी शिवसेनेला नकळत शिवसेनेचा हिंदुत्ववादी चेहरा मलिन करून शिवसेनेचा मतदार तोडला. पवारांचा प्लॅन योग्य रीतीने चालला. काँग्रेस आपोआप संपत चालली होती आणि शिवसेना राष्ट्रवादीने कमकुवत केल्याने राज्यात भविष्यात राष्ट्रवादी व भाजप हेच दोन पक्ष मजबूत राहतील हा पवारांचा गेम जवळजवळ पूर्ण झाला.
एकनाथ शिंदेंचा बंड यशस्वी झाला. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पायउतार झाले, फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होऊन शिंदे उपमुख्यमंत्री होतील, भाजपा राज्यात सत्तेत येईल अशी समीकरणे जुळून आली. भाजपाच्या आमदार, नेते, कार्यकर्त्यांनी पेढे वाटून जोरदार जल्लोष केला. अनेकांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदासाठी शुभेच्छा दिल्या. देवेंद्र फडणवीस यांनी तर वर्षा बंगल्यावर जाण्याची तयारी सुद्धा केली. भाजपाच्या नेत्यांनी शिवसेना नेतृत्वावर तोंडसुख देखील घेतले. परंतु “मी पुन्हा येणार” म्हणत जवळपास मुख्यमंत्री पदावर आलेलेच देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रीय नेतृत्वानेच पत्रकार परिषदेत सत्ता स्थापणेची घोषणा करताना मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे यांचे पुढे करून खुद्द देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या आमदारांनाच आश्चर्याचा जोरदार धक्का दिला. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करून भाजपाने एका दगडात अनेक पक्षी मारले. महाराष्ट्रातील जनतेच्या मनात आपला मान वाढवला, आणि मुख्य म्हणजे शिवसेना पक्ष फोडल्याचे खापर आपल्या डोक्यावर येणार नाही याची पद्धतशीर काळजी घेतली आणि एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री करून भाजपाचा उदार चेहरा देशाच्या समोर उभा केला. भाजपा नेतृत्वाने शिंदेंना मुख्यमंत्री पद दिल्याने फडणवीस यांनी आपण मंत्रिमंडळाच्या बाहेर राहून मंत्रीमंडळावर लक्ष ठेवणार अशी घोषणा पत्रकार परिषदेत केली. परंतु भाजपाच्या राष्ट्रीय नेतृत्वाने फडणवीसांच्या घोषणेला काही मिनिटे होतात तोवर राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी फडणवीसांनी उपमुख्यमंत्री व्हावे अशी राष्ट्रीय नेतृत्वाची इच्छा असल्याचे बोलून दाखवले, आणि इच्छा नसतानाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आपली कारकीर्द गाजवलेले देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून राज्याच्या राजकारणात पुन्हा आले.
देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या हुशार नेतृत्वाने छाप पाडली होतीच परंतु राज्यात सत्ता पुन्हा येईपर्यंत पद्धतशीरपणे लढा उभारला आणि महाविकास आघाडी सरकारला खिंडीत पकडून नामोहरम केले होते. फडणवीसांनी महाराष्ट्रात पुन्हा भाजपाचे सरकार स्थापण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली होती त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्री पदावर फडणवीस पुन्हा विराजमान होतील अशी अटकळ बांधली होती. परंतु कदाचित फडणवीसांची हुशारीच त्यांच्या प्रगतीच्या आड आली आणि भाजपच्या चाणक्यांनी चाल खेळत फडणवीसांना एक पाऊल मागे ढकलत उपमुख्यमंत्री पदावर बसण्यास भाग पाडले. राज्याच्या राजकारणात मंत्रिमंडळात फडणवीसांची भाजपाला गरज आहेच, परंतु मुख्यमंत्री पद भूषविलेल्या व्यक्तीस पुन्हा उपमुख्यमंत्री करणे म्हणजे फडणवीसांचा अपमान झाल्यासारखेच आहे, त्यात त्यांनी आपण मंत्रिमंडळात राहणार नसल्याची घोषणा केल्यावर पुन्हा राष्ट्रीय नेतृत्वाने पक्ष शिस्त म्हणून आदेश देणे कितपत योग्य होते हा देखील प्रश्नच आहे. सर्व परिस्थिती पाहता फडणवीस राष्ट्रीय नेतृत्वाला केंद्रात आले तर जड जाणार? किंवा महाराष्ट्रातील नेतृत्वाला केंद्रात मोठे होऊ न देण्याची आजवरची प्रथाच पुढे सुरू ठेवणार? असे प्रश्न यातून उपस्थित होतात.
दीपक केसरकर यांनी शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणून पत्रकार परिषदेत शिंदे गटाची बाजू मांडताना आपला विजय झाला असे न म्हणता बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण झाल्याचे म्हटले त्याच बरोबर उद्धव ठाकरेंनाही मुख्यमंत्री व्हायचे नव्हते तर एका शिवसैनिकालाच मुख्यमंत्री करायचे होते ती देखील उद्धव ठाकरेंची इच्छा पूर्ण झाल्याचे आवर्जून सांगितले. राज्यात मजबूत सरकार देणार अशी ग्वाही देत हिंदुत्वाचा विचार, बाळासाहेबांचे विचार पुढे नेणार असल्याचे देखील सांगितले. शिंदे गटाची बाजू मांडताना केसरकरांनी आम्ही शिवसेनेचेच आहोत याची पुन्हा एकदा आठवण करून दिली.
महाराष्ट्रात भाजपा-शिवसेना शिंदे गटाची सत्ता आली, एकनाथ शिंदे, फडणवीसांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदांच्या शपथा घेतल्या…. परंतु महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात मात्र माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घर करून गेले…आपल्या शांत संयमी स्वभावाने, फेसबुक लाईव्ह असो वा पत्रकार परिषद प्रत्येकवेळी जनतेशी समोरासमोर संवाद साधतो अशाच भावनेने सोज्वळ मनाने मनात काहीही कटुता न ठेवता सत्याला सामोरे जाणारे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र महाराष्ट्राला भावले….
*आले किती गेले किती…उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून छाप पाडून मनात राहिले…*

प्रतिक्रिया व्यक्त करा