आज अमरावती शहरामध्ये जी डॉक्टर मंडळी आपल्या वैद्यकीय व्यवसायाबरोबरच सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक कार्यामध्ये अग्रेसर आहेत, त्यात डॉ. बबन बेलसरे यांचा वरचा क्रमांक आहे. ते वैद्यकीय शास्त्राचे विद्यार्थी आणि मी कला शाखेचा विद्यार्थी. आमचे समीकरण जुळून येण्यासाठी आमचा मित्र मुरलीधर घाटोळ हा निमित्त ठरला .मी तेव्हा अमरावतीच्या श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयामध्ये शिकत होतो. घाटोळ हे माझे जिवलग मित्र. बबन बेलसरे हे त्यांचे मित्र .त्यामुळे बबनरावचा व माझा परिचय झाला आणि तो पुढे घट्ट होत गेला. ते नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयमध्ये शिकत होते. आम्ही तेव्हा अमरावतीला साहित्यिक व सामाजिक चळवळ करीत होतो .आमचा नागपूरचा मुक्काम असला तर आमची पावलं नकळत वैद्यकीय महाविद्यालयाकडे वळायचे. बबन बेलसरेंची खोली ही आमची खोली असायची. राहायची सोय झाली .मेडिकल कॉलेज हॉस्टेल मध्ये जेवायची सोय झाली आणि आमची चळवळ अशीच सुरू राहिली .मला आठवते मी प्रा.अशोक थोरात. सुप्रसिद्ध कवी डॉ. बबन सराडकर. प्रा. अशोक राणा या सर्वांनी बबनरावांच्या नागपूर मेडिकल कॉलेजच्या खोलीचा व मेसचा आस्वाद घेतलेला आहे. बबनरावाच्या अंगातच मुळातच सामाजिक सेवा आहे. ती त्यांनी मोडून तोढून आणलेली नाही .त्यामुळे आज ते वैद्यकीय क्षेत्रात चांगले रुजलेले असले तरी त्यांचे सामाजिक साहित्य शैक्षणिक सांस्कृतिक चळवळीमध्ये मोलाचे योगदान आहे . या कामात सौ रेखा वहिनी त्यांचे बंधू श्री बाबुराव मुरलीधर व शरद यांचा देखील सातत्याने हातभार लागत राहिला आहे. त्यांचा दवाखाना म्हणजे एक चालतीबोलती संस्था आहे .प्रा.श्याम मानव आज फार मोठ्या प्रमाणात नावलौकिकास आलेले आहेत. त्यांचे काही श्रेय बबनरावांना दिले तर त्यात वावगे होणार नाही. सुरुवातीच्या दिवसांमध्ये महेश भवन बुक करणे. सांस्कृतिक भवन बुक करणे. तिथे त्यांच्या कार्यशाळा आयोजित करणे त्यासाठी पैसा खर्च करणे या सगळ्यासाठी बबनरावांनी आपले पॉकिट त्या काळात मोकळं केलं होतं. प्रा.श्याम मानव यांचा मुंबईवरून फक्त फोन यायचा. कार्यशाळा घ्यायची आहे. हॉल बुक करणे कार्यकर्त्यांना आवश्यक त्या सोयी उपलब्ध करून देणे हे सगळं काम बबनरावच्या मार्गदर्शनासाठी चालायचं. मदतीला एड.गणेश हलकारे .लक्ष्मीकांत पंजाबी व अनिसचे इतर कार्यकर्ते असायचे. आज पैसा फार किरकोळ झालेला आहे. त्या काळात कार्यकर्त्यांजवळ पैसाच नसायचा. पण ती उणीव बबनरावांनी कधीच भासू दिली नाही. पुढे त्यांचा जयस्तंभ चौक ते पंचशील टॉकीज या मार्गावर मोठा दवाखाना झाला. या मोठ्या दवाखान्याचा उपयोग सांस्कृतिक कामासाठी होऊ लागला. प्रा. सतीश पावडे यांचा आज नाट्य क्षेत्रात मोठा दबदबा आहे .पण त्यांच्या नाटकाची प्रॅक्टिस चालते ती बबनरावांच्या दवाखान्यातच. बबनरावांनी आपला तळमजला आणि वरचा मजला त्यासाठी राखून ठेवला आहे .भाड्याने दिलेला नाही ,जयस्तंभ चौकात असलेला त्यांचा दवाखाना नाट्य क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांसाठी मोकळा होता आहे व राहिलही. त्या माणसाने पैशाकडे कधी फारसे पाहिले नाही .सामाजिक कामाला प्रामाणिकपणे वाहून घेतले .आमच्या साहित्य चळवळीमध्येही ते सातत्याने होते आहेत व राहतीलही. आम्हाला आठवते त्या काळात स्वतःची प्रॅक्टिस सांभाळून त्यांनी आम्हाला खूप वेळ दिला आहे .एक डॉक्टर साहित्यिक कार्यक्रमाला येतो सांस्कृतिक कार्यक्रमाला येतो स्वतःची गाडी घेऊन येतो आणि प्रसंगी चांगली देणगी देतो हे आम्ही विसरणार नाही नाही.आज आमचे पितामह डॉक्टर मोतीलाल राठी नाहीत पण डाँ. बबन बेलसरे यांच्याकडे पाहिले की आम्हाला डॉक्टर मोतीलाल राठी यांची उणीव भरून काढल्यासारखे वाटते. सातत्याने हसरा चेहरा .सातत्याने गरीब लोकांना मदत हा माणूस करीत राहिला आहे होता आणि राहणारही आहे .आम्हाला आठवते सुरेश भटांचा कार्यक्रम घ्यायचा होता आणि तो अचानकच ठरला होता .बबनराव म्हणाले चला आपल्याच घरी घेऊ या. आता सुरेश भटांचा कार्यक्रम. तोही गीत गझलचा असल्याचा कार्यक्रम घरी ठेवणे म्हणजे तशी तारेवरची कसरतच. पण ती तारेवरची कसरत बबनरावांनी व सौ रेखा वहिनींनी अतिशय यशस्वीरित्या पार पाडली .मला असं वाटते कार्यक्रम संपला तेव्हा रात्रीचे दोन वाजले होते .सुरेश भटांनी देखील आयोजनाची मनापासून तारीफ केली. कोणतेही काम करायचं ते मनापासूनच. देखावा करायचा नाही. प्रसिद्धी करायची नाही .मागे ते एक वेळा म्हणाले काठोळे माझे फोटो वगैरे नका छापत जाऊ .मी माझे काम करीत आहे आणि करीत राहणार आहे. मध्यंतरी एकदा सतीश पावडे व निशा शेंडे हे अडचणीत आले होते .काहीतरी काम होते .पण त्या कामी त्यांना मदत करणे यासाठी डॉक्टर साहेबांनी तन-मन-धनाने मदत केली .लोक बोलणारे खूप असतात आणि वेळप्रसंगी आले तर घेतला काढून खांदा ओळखीच्या माणसांनी अशी वेळ येते. पण बबनराव मात्र याला अपवाद आहेत .त्यांच्या दवाखान्याचे उद्घाटनही किंवा दवाखान्यात होणाऱ्या कार्यक्रमातही फारसे प्रमुख पाहुणे नसतात .ते पेशंटलाच प्रमुख पाहुणे बनवतात .पेशंट जेव्हा प्रमुख पाहुणा बनतो तेव्हा त्याचा जो आनंद आहे तो पाहण्यासारखा असतो .आज 29 जून बबनरावचा वाढदिवस. आज आमच्या साहित्य संगम विदर्भ सत्यशोधक मंडळ बहुजन साहित्य परिषद डॉ. पंजाबराव देशमुख अकादमी .मिशन आयएएस या सर्व चळवळीमध्ये हे माझ्याबरोबर आहेत होते आणि राहतीलही. मागे माझी मुलगी प्राची काठोळेचे एक ऑपरेशन होते. ऑपरेशन कराण्यासाठी डॉ.प्रकाश सुने. डॉक्टर शशी चौधरी आले .बाकी डॉक्टर मंडळी आली. आणि डॉक्टर मंडळी चौकशी करायला लागली .पेशंटचे आई-वडील कुठे आहेत. डॉ. बबन बेलसरे म्हणाले ती माझीच मुलगी आहे .तिचे आई-वडील ही भूमिका माझीच आहे .ऑपरेशन झाले आणि बिल देण्याची वेळ आली तेव्हा एकाही डॉक्टरांनी आमच्याकडून एक रुपयाही घेतला नाही .सरांची मुलगी ही आमचीच मुलगी .त्यामुळे आम्ही पैसे घेणार नाही असे सर्वांनी मला सांगितले.मला आठवते माझी मुलगी प्राची तेव्हा लहान होती .मी तिला घेऊन सहज बबनरावांच्या मांगीलाल प्लॉट येथील घरी गेलो. त्यांनी तेव्हा नवीन कार घेतली होती. ते प्राचीला म्हणाले चल आपण फिरून येऊआणि आम्ही फिरायला निघालो .तेव्हा अमरावतीमध्ये फारशी हॉटेलं नव्हती. एकच हॉटेल होतं .जे प्रसिद्ध होतं .ते म्हणजे गड्डा हाँटेल होते .ते गड्डा हॉटेलमध्ये मला घेऊन गेले. ऑर्डर दिली . अल्पोपहार केला आणि मग बबनरावांचे आणि विनायकराव तायडेंचे सौम्य भांडण सुरू झाले .बबनराव पैसे द्यायला गेले .विनायकराव पैसे घ्यायला तयार नव्हते .ते म्हणाले काठोळेसाहेबांच्या मुलीला तुम्ही घेऊन आलेले आहेत. मी पैसे घेणार नाही .बबन बेलसरे म्हणाले मी घेऊन आलेलो आहे .त्यामुळे तुम्ही पैसे घेतले पाहिजे आणि यामध्ये विजय झाला तो विनायकराव तायडे यांचाच. विनायकराव तायडे हा माणूस असा आगळावेगळा माणूस होता .ते आज नाहीत.त्यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. सामाजिक जीवनात डॉक्टर मंडळी राहिली तर डॉक्टरांचे स्वास्थ देखील चांगले राहते.कारण सातत्याने चेहरा हसतमुख ठेवणे हे खरंच कठीण काम असतं .पण हे बबनरावांना जमलेले आहे.1994 साली आम्ही प्रा.शाम मानवांची सात दिवसांची व्याख्यानमाला घेतली. त्यासाठी अमरावतीच्या मनीबाई गुजराती हायस्कूल आंबापेठचे मैदान बुक केले .एवढा मोठा कार्यक्रम अमरावतीच्या इतिहासात यापूर्वी झाला नाही आणि होणारही नाही. साधारणत दररोज दहा हजार एवढी प्रचंड गर्दी मानवांच्या व्याख्यानाला असायची. या व्याख्यानमालेचा खर्च प्रचंड होता. 1994 सालची गोष्ट. पण त्यावेळेस देखील बबनरावांनी भरपूर मदत केली. पण त्यांच्या मित्रमंडळी मधून डॉक्टर जयभारत पोटोडे असतील शोभाताई पोटोडे असतील यांच्याकडून आणि यांच्यासारख्या मित्रांकडूनही मदत मिळवून दिली. आजही ते मूक बधिर मुलांसाठी काम करतात .डॉ.विनायक व सरिता कडू त्यांना मदत करतात आणि ही संस्था मोठी व्हावी .त्या संस्थेला चांगली स्वतःची जागा मिळावी यासाठी आपल्या चांगुलपणाचा वापर करून त्या संस्थेला जागा व इमारती बांधण्यासाठी डॉक्टर बबन बेलसरे यांनी तन-मन-धनाने मदत केली आहे .विनायक कडू जर भेटले तर ते सगळा तपशील सांगतील. असा हा अमरावतीच्या साहित्यिक सामाजिक संस्कृती मध्ये स्वतःला समर्पण भावनाने काम करणारा माणूस .अशा या दिलखुलास हसतमुख माणसाला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा त्याचबरोबर त्यांच्या या कार्याला सातत्याने त्यांच्याबरोबर राहणाऱ्या व त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देणाऱ्या सौ. रेखा वहिनींना देखील शुभेच्छा. प्रा डॉ. नरेशचंद्र काठोळे .संचालक. डॉ.पंजाबराव देशमुख अकादमी .अमरावती 98 90 96 7003