जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ सुमती पवार यांची अप्रतिम काव्यरचना
असे नक्षत्रांचे देणे फार जातो थोडा काळ
घर उन्हात बांधती वर मोकळे आभाळ
व्यवहारात चटके हिशोबात नाही चूक
नाही भागत अशाने आसुसली प्रेम भुक ..
वर होत्याच चांदण्या खाली होते तप्त ऊन
त्यात कशी वाजावी रे प्रेमरंगाची ती धून
तारे नक्षत्रांचे जग त्यांच्या पुरते असते
वसुंधरा तिचे दु:ख खाली राहून भोगते…
प्रेम माया त्यागबीग क्षणभंगुर वल्गना
आयु संपते तरी ही कसा माणूस कळेना
सरड्याचे रंग बरे माणूस तो नटवर्य
वर्ख जाता निघून रे मग कळे त्याचे कार्य…
व्यवहार असे सारा असे पुरता देखावा
स्वार्थ भरला ठासून कुठे माणूस शोधावा
हिरे असतात थोडे गारगोट्यांची भरती
जाते पटत ओळख त्यात आयुष्ये सरती…
मुलाम्याचे जग सारे आत लक्तरे भरली
उभा जन्म जळतो नि होते जीवाची काहिली
धडपडतात सारे कुठे भेटावी सावली
जाती शरणच सारे करे कृतार्थ “माऊली…”
नाही सुटका कुणाची येनकेनप्रकारेण
नक्षत्रांचे होती सूर्य जना भाजण्या कारण
येती पानथळ जागा विसावतात पांथस्थ
पुढच्यास सांगतात वा वा ! जीवन ते मस्त…
डोके घातल्या वाचून कसे कळतील धोके
वस्र नेसल्या वाचून कशी कळतील भोके
दूर डोंगर साजरे नक्षत्रे ती वर बरी
नक्षत्रांचे देणे भूल आहे जमिन ती खरी …
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : २७ जून २०२२
वेळ : सकाळी १० : ३४