मालवण
स्पर्धा परीक्षेविषयी निःशुल्क जागृती करणारे तिमिरातून तेजाकडे चळवळीचे प्रणेते, कनिष्ठ सीमाशुल्क अनुवाद अधिकारी सत्यवान रेडकर यांचे ओझर विद्यामंदिर कांदळगाव प्रशालेमध्ये स्पर्धा परीक्षा विषयक मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न झाले. या व्याख्यानात सत्यवान रेडकर यांनी विविध स्पर्धा परीक्षांविषयी माहिती देत अभ्यासक्रम व परीक्षेची तयारी याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
भंडारी समाज महासंघ महाराष्ट्र राज्य आणि ओझर विद्यामंदिर कांदळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ओझर विद्यामंदिरचे मुख्याध्यापक प्रतापराव खोत यांनी सत्यवान रेडकर यांचे स्वागत करत सत्कार केला. तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. व्याख्यानाची सुरुवात ओझर विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी एका स्फूर्तीगीताने केली. आपल्या व्याख्यानामधून सत्यवान रेडकर यांनी विद्यार्थ्यांना शासकीय नोकरी मिळविण्यासाठी लागणाऱ्या अनेक स्पर्धा परीक्षांविषयी सविस्तर माहिती दिली. प्रत्येक स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम आणि स्पर्धा परीक्षेची तयारी व अभ्यास करण्याच्या क्लृप्त्या त्यांनी विद्यार्थ्यांना रंजक भाषेतून सांगितल्या. त्यांनी विद्यार्थ्यांचे सामान्यज्ञान तसेच गणितीय ज्ञान वाढविण्यासाठी शाळेत राबविण्याचे विविध उपक्रमही सुचविले. या व्याख्यानाला विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.
व्याख्यानाच्या आयोजनासाठी भंडारी समाज महासंघाचे अध्यक्ष तुषार कांबळी यांनी विशेष मेहनत घेतली. या व्याख्यानासाठी ओझर विद्यामंदिरचे मुख्याध्यापक प्रतापराव खोत, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच ओझर विद्यामंदिरचे आजी-माजी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी कु.रिया कांदळगावकर हिने केले, तर कु. मधुरा आयकर हिने उपस्थिताचे मानले.