हजारो एकर जमिन खाऱ्या पाण्याखाली..
सावंतवाडी :
आरोंदा वाघधरे मुख्य बंधाऱ्यानजीक च्या कोल्याची भाट येथिल बंधारा फुटून खारपाणी शेतात शिरल्याने हजारो एकर शेतजमीन खाऱ्यापाण्याखाली गेली आहे. दोन दिवसांपूर्वी या बंधाऱ्याला सुमारे दोन मीटर रुंदीचे भगदाड पडले होते.मात्र आता तर हे भगदाड अधिका-अधिक वाढतच चालले आहे. त्यामुळे मोठ्या प्रवाहाने पाणी शेतजमिनीत शिरत असल्याचे येथील शेतकरी सांगत आहे.
तसेच शेतीसोबत आसपास परिसरातील घरानाही धोका निर्माण झाला आहे. याबात आरोंदा सरपंच यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी असे सांगितलं की, ग्रामपंचायत आरोंदा यांनी वेळोवेळी याची कल्पना खारभुमी खाते, वेंगुर्ला यांच्याशी पत्रव्यवहार करून माहिती दिली होती मात्र संबंधित खात्याचे अधिकारी येऊन पाहणी करून गेले. त्यानंतर ह्या गोष्टीकडे त्यांनी पूर्णतः दुर्लक्ष केल्याने आता हे भगदाड वाढतच आहे. त्यामुळे येथील खार पाणी शेतात घुसून शेत व आजूबाजूच्या घराना त्याचा धोका निर्माण झाला आहे. याकडे संबंधीत खात्याने लवकरात लवकर उपाय योजना कराव्या अन्यथा याबाबत येथील शेतकरी लवकरात लवकर बैठक घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याचे ते म्हणाले.