वेंगुर्ले येथील प्रबोधनात्मक चर्चासत्र कार्यक्रमात संभाजी कांबळे यांचे आवाहन
वेंगुर्ले
आजची पिढीही उद्याचे भविष्य आहे त्यामुळे युवा पिढीने व्यसनांपासून दूर राहावे. अमली पदार्थाच्या सेवनामुळे आयुष्य उदध्वस्त होते. त्यामुळेच अमली पदार्थविरोधी कायदा असून त्यात शिक्षेचीही तरतूद आहे. अमली पदार्थाच्या सेवनामुळे क्षणिक सुख मिळात असले तरी त्यातून जीवन बरबाद हे लक्षात ठेवावे, अमली पदार्थाच्या विरोधातील या लढ्यात सामाजिक संघटनांबरोबर प्रत्येक पालकांनीही सहभागी होण्याची गरज आहे असे आवाहन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सिंधुदुर्ग चे पी.एस.आय संभाजी कांबळे यांनी वेंगुर्ले येथे बोलताना केले.
“एक पल का नशा..जीवनभर करी सजा”… “मादक द्रव्याची गोळी…करी जीवनाची होळी”…या बाबत जनजागृतीसाठी ‘आम्ही वेंगुर्लेकर’ तर्फे वेंगुर्ले हायस्कूल सभाग्रहात अंमली पदार्थ विरोधी सप्ताह निमित्त काल “जनजागृती व प्रबोधनात्मक चर्चासत्र” आयोजित केले होते. यावेळी मार्गदर्शन करताना श्री. कांबळे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अर्पिता मुंबरकर, जिल्हा संघटक, जिल्हा व्यसनमुक्ती समिती, अतुल जाधव, पोलिस निरीक्षक, वेंगुर्ला, दीपलक्ष्मी पडते, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, प्रज्ञा परब, सामाजिक कार्यकर्ते, नंदन वेंगुर्लेकर, सचिव आधार फौंडेशन, सिंधुदुर्ग, श्रीनिवास गावडे, जिल्ह्याध्यक्ष, युथ संस्था, सिंधुदुर्ग, अभिषेक वेंगुर्लेकर, सामाजिक कार्यकर्ते, जयराम वायंगणकर, सामाजिक कार्यकर्ते, प्रमोद कांबळे, मुख्याध्यापक, वेंगुर्ला हायस्कूल, ॲड. सुषमा खानोलकर, सामाजिक कार्यकर्ते, वामन कांबळे, सामाजिक कार्यकर्ते, शामराव काळे, सामाजिक कार्यकर्ते, प्रदीप सावंत अध्यक्ष तालुका पत्रकार संघ आदी मान्यवर उपस्थित होते.
अंमली पदार्थ विरोधी सप्ताह शासनामार्फत दिनांक 19 जून ते ते 26 जून या कालावधीत
आयोजित केला असून 26 जून रोजी अंमली पदार्थ विरोधी दिन संपूर्ण महाराष्ट्रात आयोजित करण्यात आला आहे.
दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात अंमली पदार्थाची तस्करी, सेवन, विक्री व वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली असून आपली तरुणाई या नशेमध्ये गुंतत चालल्याचे निदर्शनास येत आहे. यासाठीच व्यसनाधीन झालेल्या तरुण पिढीला वेळीच योग्य दिशा देण्यासाठी विशेष उपक्रम पोलीस प्रशासन व नागरिकांच्या सहकार्याने दिनांक 26 जून पासून सुरू करण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून वेंगुर्ले येथे हे चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते असे नंदन वेंगुर्लेकर यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले. यावेळी जिल्हा व्यसनमुक्ती समिती जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर यांनी व्यसन मुक्ती बाबत सुरू असलेल्या जिल्ह्यातील कार्याबाबत माहिती दिली. कार्यक्रमाला पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. सुषमा खानोलकर यांनी तर आभार प्रज्ञा परब यांनी मानले.