You are currently viewing माझी शाळा …

माझी शाळा …

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ सुमती पवार यांचा अप्रतिम लेख

ती पहा मला लांबवर गढी दिसते आहे.गढीला खेटून
आमची भात नदी वाहते.असं म्हणतात की, भात शिजे
पर्यंतच या नदीचे पाणी टिकते म्हणून ही भातनदी!
हं , तर काय सांगत होते? गढी नि गढीवर भरणारी
आमची कापडण्याची शाळा ! अहो, आता तुमच्याशी
बोलतांना मी शाळेतच पोहोचले आहे. किती रम्य आठवणी
आहेत हो शाळेच्या! गढी, गढीचा कठडा व कठड्यावरून
पलीकडे डोकावून पाहिले की, बाप रे खोऽऽऽऽऽल दरी!
चक्करच यावी अशी खोऽऽऽऽऽल दरी! नि त्या दरी मध्ये
फुफाट वेगाने वाहणारी भात नदी, आता ही ते दृष्य मला
डोळ्यांसमोर दिसते आहे. शाळेच्या मागे ऐसपैस असे
भले मोठे पटांगण, जिथे रोज प्रार्थना, व्यायाम होत असतं
व दर आठवड्याच्या साप्ताहिक परिक्षा देखील.

रोज सकाळी धावत पळत शाळा गाठायची व प्रार्थनेला
उभे रहायचे व मन लावून प्रार्थना म्हणायची. मला आठवते,
गावात पेपर म्हणजे वर्तमानपत्र नावाची गोष्ट फक्त आमच्या
घरी येत असे. मी तिसरी चवथित असतांना इतक्या जुन्या
काळी खेड्यात पेपर? अगदी अशक्य गोष्ट होती ती!
म्हणून शाळेतील परिपाठाला सकाळी प्रार्थना संपल्यावर
पेपर मधील काही बातम्या प्रार्थनेच्या वेळी पटांगणात वाचून
दाखवायचे काम माझ्याकडे असायचे. खूप भीती वाटायची
पण बाईंना नाही कसे म्हणणार ?मग मी पेपर समोर धरून
खुणा करून आणलेल्या बातम्या वाचून दाखवत असे.हा पेपर
वाचण्याचा संस्कार ही शाळेमुळेच घडला व रूजला मग कोविड काळापर्यंत मी रोज चार पेपर वाचत असे.
त्या काळी तुम्ही आज कोणती एखादी चांगली गोष्ट केली
ते रोज वहीवर लिहून दाखवावे लागे. बघा कसे संस्कार होत
असत न कळत..! म्हणजे दिवसभरात एखादे तरी सत्कृत्य
तुमच्याकडून घडायला हवे असा संस्कार मनावर न कळत का
होईना रूजला. अरे, आपण एखादे तरी चांगले काम करायला
हवे असे मनावर बिंबवले गेले. ह्या गोष्टीचा लहानपणी नाही
पण मोठेपणी तरी माणूस विचार करतोच ना?

म्हणून पायाभूत शिक्षण देणाऱ्या या शाळा मला फार
महत्वाच्या वाटतात.आज हे चित्र नि ह्या निष्ठा कितपत आहेत
या बद्दल मी खूप साशंक आहे. ज्या पद्धतीने नीतीमत्तेची
घसरण होते आहे ते पाहता ही गोष्ट फारच चिंताजनक आहे.
शिस्त तर अतिशय करडी असे.शिक्षक निष्ठावान होते, हो,
कामावर निष्ठा असेल तरच हातून चांगले काम घडते.मी माझ्या “चला कापडण्याला” या पुस्तकात उल्लेख केला आहे
की, लेकसभा व विधान सभेचे कामकाज कसे चालते हे
आमच्या गुरूजींनी आमचे मुलांचे गट तयार करून बसवले
व प्रत्यक्ष कामकाज कसे चालते ते समजावले. संख्या किती
असते हे ही सांगितले. प्रात्यक्षिका मुळे ते डोक्यात अगदी फिट
बसले ते आजतागायत! अशा होत्या शाळा नि असे होते शिक्षक त्या काळी ! आमच्या दुसऱ्या तुकडीचे दंगल मास्तर
सर भुगोल खूप छान शिकवत . आमच्या एकनाथ मास्तरांनी
काय करावे? अहो, त्यांनाच एका तासाला भुगोल शिकवायला
बोलवले व त्यांनी वर्गाबाहेर नदी काठावर खारे , मतलई वारे
आम्हाला शिकवले, ही भात नदी म्हणजे आपला समुद्र !
बघा आहे कुठला ईगो? दुःस्वास ? नाही .. म्हणून तर आम्ही
असे घडलो ना ? अशी शाळा व असे शिक्षक असल्यावर
उत्तम नागरिक घडणारच घडणार ..! पटांगणात आठवडे परिक्षा अगदी शिस्तित होत असत. ग्रोसच्या ग्रोस पेपरचे गठ्ठे
थप्पी लावलेले अजून मला दिसतात.सुंदर अक्षर असलेल्या
मुलांकडून पातळ कागदावर सुंदर अक्षरातील व्याकरण तर
किती तरी वर्षे मुलांनी पाठ केले.

 

आज आपण फक्त सत्ता आणि पैशाच्या मागे धावत आहोत.
त्याला काही धरबंध राहिला नाही इतके आपण वाहवत जात
आहोत. काय होईल आपल्या पुढच्या पिढ्यांचे? माहित नाही.
सुदैवच म्हणू या की आपण ते बघायला नसणार असे नाईलाजाने म्हणावे लागेल .शाळा व उत्तम शिक्षकच उत्तम
नागरिक घडवतात यात मुळीच शंका नाही म्हणून प्राथमिक
शाळातील शिक्षकांची नेमणूक तावून सुलाखून पारखून
करायला हवी. तरच देशाची भावी पिढी कर्तृत्ववान निपजू शकेल. भारतात राहणाऱ्या प्रत्येक भारतीयाला या विषयी
कळकळ व तळमळ वाटली पाहिजे, नव्हे प्रत्येक भारतीयाचे
ते कामच आहे.

॥ धन्यवाद॥

आणि हो , ही फक्त माझी मते आहेत..

प्रा.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : २२ जून २०२२
वेळ : सकाळी १० : ४८

प्रतिक्रिया व्यक्त करा