दीपक पटेकर [दीपि]
योग ही भारताच्या प्राचीन काळापासून आलेली एक संकल्पना…! योग ही पाच हजार वर्षांपासून चालत आलेली परंपरा असून त्याचा उल्लेख नारदीय सूक्त आणि प्राचीन अशा ऋग्वेदात आढळतो. योग म्हणजे व्यायाम…परंतु व्यायाम म्हटल्यावर आपण शरीराची तंदरुस्ती राखण्यासाठी करतो… परंतु योग हा शरीराबरोबरच मन आणि आत्म्याचा संपूर्ण व्यायाम आहे. आपल्यापैकी कित्येकांना योग म्हणजे काय? योगाचे महत्त्व काय? याबद्दल अतिशय तुटक, अर्धवट माहिती आहे. योगाभ्यासने मानवी जीवनशैलीचा परिपूर्ण सारांश प्राप्त होतो..योग हे केवळ ज्ञान नसून ते परिपूर्ण विज्ञान आहे. योग हा निव्वळ व्यायाम किंवा आसन नसून भावनात्मक समतोल आणि अनादि अनंत तत्त्वांना स्पर्श करत अध्यात्मिक प्रगतीतील सर्व शक्यतांची ओळख करून देणारे शास्त्र आहे. अशाप्रकारे प्राचीन काळापासून योगाला फार महत्त्व आहे.
सध्याच्या आधुनिक धावपळीच्या युगात आपण सर्व प्रकारची कामे करतो, त्यातून शारीरिक थकावट होते, मानसिक स्वास्थ्य बिघडते तरीही आपल्याला आपल्या प्रकृतीकडे, आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. माणूस म्हणजे गरजेच्या आदेशानुसार वागणारा आधुनिक युगातील रोबोट बनला आहे. अशावेळी व्यायामाचे आणि योगाचे आपल्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान आहे. योगा केल्याने आपल्या मनावरील, शरीरावरील ताण तणाव नाहीसे होतात. मानवाचे शरीर निरोगी राहून शरीराच्या हाड, मास, पेशी वजन कमी होऊन लठ्ठपणा नाहीसा होतो. शरीर दणकट राहते, शरीरामध्ये एक प्रकारची ऊर्जा निर्माण होते. शरीर रोगमुक्त होऊन रक्तदाबासारख्या समस्या नाहीशा होतात.
योग करणे जीवनासाठी अत्यावश्यक असले तरी शास्त्रशुद्ध योगाभ्यास करणे आरोग्य व शरीराच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. तरच योगाभ्यास शरीरासाठी फायदेशीर ठरते. आजचे जीवन अत्यंत धावपळीचे व गतिमान झालेले असून प्रत्येकजण आपल्या खाण्याच्या सवयी, बाजारात मिळणारी भेसळयुक्त धान्ये, दूध, तेल आदी खाद्यपदार्थ, बेकारी उत्पादने, खतयुक्त भाजीपाला इत्यादींमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन आरोग्याच्या अनेक समस्यांच्या गर्तेत सापडला आहे. त्यामुळे आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपल्याला योग करणे गरजेचे असून योगाभ्यास ही काळाची गरज बनली आहे.