You are currently viewing ठाकरेंची सेना आता शिंदे सेना?

ठाकरेंची सेना आता शिंदे सेना?

आमदार दीपक केसरकर भाजपात जाणार?

संपादकीय….

गेले वर्षभर महाविकास आघाडी सरकार पडणार आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार अशा वल्गना राज्यातील भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून वारंवार करण्यात येत होत्या. भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील आणि केंद्रीयमंत्री नारायण राणे कित्येकदा तारखांवर तारखा देत होते. परंतु महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नाही असे सांगत सरकार कायम राहील असा दिलासा दिला होता.
मागच्या आठवड्यात राज्यसभेच्या झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचा दुसरा उमेदवार संजय पवार हे पडले आणि भाजपाकडे बहुमत नसताना देखील भाजपाचा उमेदवार निवडून आला तिथेच राजकीय गणित बदलत गेले. राष्ट्रवादीच्या समर्थक अपक्षांनी विरोधी मतदान केल्याचे बोलले गेले आणि तिथून नाराजी नाट्याला सुरुवात झाली. विधानपरिषदेच्या निवडणुकीत देखील भाजपाने महाविकास आघाडीची मते आपल्याकडे खेचत 5 उमेदवार निवडून आणून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करिष्मा केला. विधानपरिषद निवडणुकीनंतर मतमोजणीला भाजपाकडून वेळकाढू धोरणे आखली गेली शिवसेनेचे काही आमदार तात्काळ एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरतकडे रवाना झाल्याचे बोलले गेले. एकंदरीत शिवसेनेच्या आमदारांमध्ये उभी फूट पडली आणि तब्बल 35 आमदार शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या सोबत असून केवळ 18/20 आमदार शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत असल्याचे शिवसेनेच्या दुपारी पार पडलेल्या बैठकीत स्पष्ट झाले.
शिवसेना आमदारांच्या मुख्यमंत्र्यांच्या वर्षा येथे पार पडलेल्या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमदार वैभव नाईक हजर होते, परंतु आमदार दीपक केसरकर हजर नसल्याचे समजते. त्यामुळे सावंतवाडी शहरात आमदार दीपक केसरकर भाजपा मध्ये जाणार अशा चर्चांना उत आला आहे. दीपक केसरकर यांना ठाकरे सरकारकडून वारंवार सापनत्वाची वागणूक देण्यात येत होती, जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांकडूनही डावलले जात होते, त्यामुळे केसरकर शिवसेनेत नाराज असल्याचेच दिसून येत होते, जिल्ह्याचा विकासही गेल्या दोन वर्षांपासून रखडला होता. आमदार केसरकर आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे असलेले जवळचे संबंध पाहता केसरकर भाजपामध्ये गेल्यास नवल वाटू नये.
भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सावंतवाडीत विधानपरिषद विजयाचे फटाके फोडल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांना “तुम्ही घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी आहे” असा दिलासा दिला. त्याचबरोबर “कोकणातील आमदार भाजपाच्या पाठीशी राहतील आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील राजकीय भूकंप होईल, जे कोणी येतील त्यांचे आम्ही स्वागतच करू” असे विधान करून आमदार दीपक केसरकरांसाठी तर दरवाजे खुले केले नाहीत ना? असा प्रश्न सिंधुदुर्ग जिल्हावासीयांना पडला आहे. केंद्रातील भाजपा सरकारने एका मागून एका शिवसेना नेत्यांच्या मागे लावलेला ईडी चा ससेमिरा पाहता राज्यातील अनेक आमदार भाजपासोबत जाण्याच्या मनस्थितीत होते, शेवटी राज्यसभेत राष्ट्रवादी समर्थकांची आणि विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेची फुटलेली मते पाहता ही कोंडी लवकरच सुटेल आणि राज्यात राजकीय भूकंप येईल असे वाटत असतानाच एका रात्रीतच भूकंप झाला आणि ठाकरेंच्या नेतृत्वाखाली असलेल्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारला धोका निर्माण झाला… सर्व परिस्थितीचा विचार करता केंद्रातील भाजपाच्या सरकारी यंत्रणांच्या दबावामुळे शिवसेना नेतृत्वाकडून तर ही खेळी खेळली गेली नाही ना? अशीही शंका उपस्थित केली जात आहे. या सर्व जरतरच्या राजकारणात राज्यातील महाविकास आघाडी सरकार मात्र अडचणीत आले असून सरकारचे भवितव्य एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदार आणि एकनाथ शिंदे यांच्यावरच अवलंबून आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा