ओरोस :
मूळ बिळवस व ओरोस येथे वास्तव्यास असलेले तेजस राजन चव्हाण (वय ३२) यांचे सोमवारी सौम्य हृदयविकार झटक्यानंतर डोक्यास दुखापत झाल्यामुळे दु:खद निधन झाले.
ज्येष्ठ पत्रकार व विधीमंडळ वार्ताहर संघाचे सदस्य व माजी अध्यक्ष राजन चव्हाण यांचे ते पुत्र होते.
त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी भाऊ भावजय परिवार आहे. त्याच्या या दुःखद निधनामुळे ओरोस परिसरात शोककळा पसरली.
कुडाळ एमआयडीसी येथील वखार महामंडळाच्या कार्यालयात तेजस चव्हाण हे सुपरवायझर पदावर कार्यरत होते. ते या कार्यालयात काम करत असताना त्यांना चक्कर येऊन खाली कोसळले. त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. लागलीच त्यांना अन्य कर्मचाऱ्यांनी कुडाळ येथील खाजगी रुग्णालयात हलविले. मात्र त्यांचे तत्पूर्वीच निधन झाले होते.
शांत मनमिळाऊ स्वभाव म्हणून त्यांचा परिचय होता. वर्षभरापूर्वी त्यांचा विवाह झाला होता. ओरोस येथील रवळनाथ मंदिरा समोर व जिजामाता सर्कल येथे त्यांचे व्यवसाय होते. नोकरी आणि व्यवसायातही त्यानी चांगली चमक दाखवली होती. ज्येष्ठ पत्रकार राजन चव्हाण, शिक्षण विभागातील निवृत्त अधीक्षक सौ. शुभांगी चव्हाण यांचा तेजस हा मुलगा होय,तेजस यांच्यावर आता मंगळवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.