You are currently viewing संपूर्ण कुटुंबाने का केली आत्महत्या ? सांगली जिल्ह्यात हादरवणारी घटना..

संपूर्ण कुटुंबाने का केली आत्महत्या ? सांगली जिल्ह्यात हादरवणारी घटना..

एकाच कुटुंबातील 9 जणांनी विष प्राशन करुन जीवन संपवले

 

सांगली :

जिल्ह्यात हादरवणारी घटना घडली आहे. मिरजपासून 12 किमी अंतरावर म्हैसाळ येथील अंबिकानगर मध्ये विषप्राशन करुन एकाच कुटुंबातील 9 जणांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

आत्महत्या करणारे एकाच कूटुंबातील असले, तरी दोन वेगवेगळ्या ठिकाणी या आत्महत्या करण्यात आल्या आहेत. दोन सख्ख्या भावांनी त्यांच्या त्यांच्या घरात आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. हे दोन्ही भाऊ चांगले सुशिक्षित होते, तरीही त्यांनी हे पाऊल का उचलले असेल, याचे गूढ आता वाढले आहे. आर्थिक कारणांमुळे या दोन्ही कुटुंबांनी आपले जीवन संपवले असे सांगण्यात येत असले तरी, पोलीस तपासात या प्रकरणातील खरे कारण समोर येण्याची शक्यता आहे.

पशु वैद्यकीय डॉक्टर माणिक यल्लप्पा वनमोरे आणि त्यांचे भाऊ शिक्षक भाऊ पोपट यल्लप्पा वनमोरे या दोन्ही भावांनी कुटुंबासह आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. रविवारी रात्री या दोन्ही कुटुंबांनी आपआपल्या घरात एकाच वेळी विष घेऊन आपले जीवन संपवले. दोन्ही भावांच्या पत्नी आणि मुलांचा आत्महत्या करणाऱ्यांत समावेश आहे. त्याचबरोबर डॉक्टर भावासोबत राहत असलेल्या आईनेही आत्महत्या करुन जीवन संपवले आहे. एका भावाचे घर अंबिका नगर, नरवाड रोड, चौंडजे मळा येथे होते तर दुसऱ्या भावाचे घर हॉटेल राजधानी कॉर्नर परिसरात होते. या दोन्ही ठिकाणी हे मृतदेह सापडले आहेत.

रविवारी रात्री त्यांनी विष प्राशन करुन जीवन संपवल्याची माहिती आहे. राजधानी हॉटेलजवळ असलेल्या डॉ माणिक यल्लप्पा वनमोरे यांच्या घरात, माणिक, पत्नी रेखा, आई आकताई यल्लप्पा वनमोरे, मुलगी प्रतिमा ,मुलगा आदित्य आणि पुतण्या शुभम यांचे मृतदेह सापडले आहेत. तर दुसरा भाऊ पोपट वनमोरे यांच्या घरात त्यांची पत्नी संगीता, मुलगी अर्चना यांचे मृतदेह सापडले आहेत.

हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर स्थानिक चांगलेच हादरले आहेत. शिक्षक आणि डॉक्टर असलेल्या भावांनी संपूर्ण कुटुंबच संपवले हे अजूनही अनेकांच्या पचनी पडलेले नही. त्यांच्या घराबाहेर मोठी गर्दी झालेली आहे. पोलिसांनीही या प्रकरणाची गाँभिर्याने दखल घेतली आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम, उपविभागीय पोलीस अधीक्षक अशोक वीरकर, पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेंदरे हे फौजफाटा घेऊन पोहचले आहेत. संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या का केली याचा शोध आता घेण्यात येतो आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा