You are currently viewing तोंडवळी शाळा बनली सुनीसुनी

तोंडवळी शाळा बनली सुनीसुनी

शिक्षक न मिळाल्याने ग्रामस्थांचा मुलांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय…

मालवण

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोंडवळी खालची या शाळेला आवश्यक शिक्षक तातडीने न मिळाल्यास मुलांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय तोंडवळी तळाशिल ग्रामस्थांनी घेतला होता. याबाबत शिक्षण विभागाला कळवूनही दखल न घेतल्याने ग्रामस्थांनी शाळेत मुले पाठवण्याचे बंद केले आहे. जोपर्यंत मागणी केलेले शिक्षक शाळेत हजर होत नाहीत तोपर्यंत शाळेत मुले न पाठवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला.

दरम्यान शाळेत मुले पाठवण्याची विनंती करण्यास दाखल झालेल्या केंद्रप्रमुखांना आपली भूमिका सांगत ग्रामस्थ आपल्या निर्णयावर ठाम राहिले आहेत. मुलांच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीस शिक्षण विभाग जबाबदार असल्याचे उपस्थित ग्रामस्थ, पालकांनी सांगितले.

शैक्षणिक वर्ष सर्व शाळांमध्ये सुरू झाले असताना तोंडवळी शाळा मात्र मुले नसल्याने सुनी सुनी झाली होती. तोंडवळी खालची या इयत्ता सातवी पर्यंत असलेल्या आणि पटसंख्या पंचवीस असलेल्या प्राथमिक शाळेत सध्या दोनच शिक्षक कार्यरत आहेत. यासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष चोडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन एप्रिल मध्ये गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देवून पंधरा दिवसांत शिक्षक न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. गटशिक्षणाधिकाऱ्यांचे लेखी अर्जाद्वारे लक्ष वेधूनही संबंधितांकडून अजूनपर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने ग्रामस्थांनी शाळेत मुले न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

तोंडवळी खालची प्राथमिक शाळेत २५ मुलांची पटसंख्या असताना शिक्षण विभागाकडे वारंवार मागणी करुनही कायमस्वरूपी शिक्षक दिला जात नसल्याने तोंडवळी तळाशिल येथील ग्रामस्थांनी मुलांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेत शाळेत मुले पाठवणे शाळेच्या पहिल्या दिवसापासून बंद केले. आज पालकांचे मन वळवण्यासाठी दाखल झालेल्या केंद्रप्रमुख प्रसाद चिंदरकर यांच्या विनंतीनंतरही ग्रामस्थांनी जोपर्यंत कायमस्वरूपी शिक्षक मिळत नाही तोपर्यंत शाळेत मुले न पाठवण्याच्या निर्णयावर ठाम राहिले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जितेंद्र चोडणेकर, स्नेहा कांदळगावकर, स्मिता मालंडकर, जान्हवी पराडकर, पल्लवी कोचरेकर, पुंडलिक मालंडकर, गणपत शेलटकर, नंदकुमार कोचरेकर व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

तोंडवळी प्राथमिक शाळेची पटसंख्या नुसार एक पदवीधर व एक उपशिक्षक अशी दोन पदे रिक्त असताना या शाळेत केवळ २ शिक्षक उपलब्ध आहेत. त्यातील एक शिक्षिका मुलांना शिकवतच नाही, त्यांच्यांशी संवाद साधत नाही अशा वारंवार तक्रारी होऊन त्यांची बदली या शाळेतून करण्यात आली होती. मात्र परंत त्याच शिक्षिकेला परत याच शाळेवर कामगिरीवर काढत शिक्षण विभागाने आम्हा ग्रामस्थांची चेष्टा चालवली असल्याचे ग्रामस्थांनी सांगत तीव्र संताप व्यक्त केला.

तोंडवळी प्राथमिक शाळेत पदवीधर शिक्षक व उपशिक्षक सातत्याने रिक्त आहेत. गेली सातवर्षे यासाठी सातत्याने ग्रामस्थ मागणी करत आहेत. मात्र दोन चार महिन्यासाठी कामगिरीवर शिक्षक दिला जातो. तो शिक्षक मुलांमध्ये रुळेपर्यंत त्याला पुन्हा मुळ शाळेवर नेले जाते. या प्रकारामुळे मुलांच्या शिक्षणाचे तीन तेरा वाजवले आहेत. गेल्यावर्षीचा अभ्यासक्रम अपुरा शिकवला गेला. मुलांना धड त्या त्या विषयांचे ज्ञान नाही अशा परिस्थितीतही शाळा टिकवण्यासाठी आम्ही पालक मुलांना शाळेत पाठवत होतो. मात्र आमच्या चांगुलपणाचा शिक्षण विभागाने फायदा घेत मुलांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा केला आहे.

आम्ही फोनवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता ते स्वीकारले जात नाहीत. हेच अधिकारी मात्र तळाशील मध्ये खासगी दौरे काढून मग्न असतात. पण त्याना शाळेच्या समस्या जाणून घेण्यात कोणतेच स्वारस्य नसल्याचे उपस्थित ग्रामस्थ पालकांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा