*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच…. लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री भारती महाजन रायबागकर यांचा अप्रतिम ललितलेख*
विषय- बेधुंदपणाची एक लहर
शीर्षक- लगाम खेचावा कधीतरी
२६ नोव्हेंबर २००८ची रात्र…
ठो…ठो…आई गं…मेलो…मेलो…वाचवा… वाचवा…बंदुकीच्या गोळ्यांचे आवाज भेदून ऐकू येताहेत हृदयद्रावक किंकाळ्या, आरडाओरड…एकामागोमाग होणाऱ्या बंदुकीच्या फैरींनी हादरतेय मुंबापुरी…एका ठिकाणच्या बातमीचे शब्द विरत नाही तोच…दुसरे ठिकाण…तिसरे ठिकाण…चौथे…पाचवे…केवळ अविश्वसनीय…पण विश्वास तरी कसा न ठेवावा…मुंबईतले प्रत्यक्षदर्शी आणि टीव्हीवरच्या पडद्यामुळे सर्व जग साक्षी…अंगाचा थरकाप व्हावा अशी घटना…आणि याला कारणीभूत ठरलीय
केवळ द्वेषापोटी…गैरमार्गाचा अवलंब केलेली…दहशतवादी कसाबकरणी…
धर्मांध माथेफिरूंच्या बेधुंदपणाची एक लहर…
आता त्यांचा खात्मा करण्यास सरसावयालाच हवंय…आमच्या नसानसात भरलंय देशभक्तीचे अमृतरूधिर…आमच्या नजरेसमोर आहे एकच लक्ष…निष्पाप, निरपराध नागरिकांचे प्राण वाचवणे…प्राणाची पर्वा न करता झुंजणे…शहीद झालो तरी बेहत्तर…पण…घरदार, संसार, मुलं-बाळं…सारी रक्ताची नाती…आपल्यावर अवलंबून असलेली…? छे…छे…डोळ्यांसमोर तानाजी मालुसरे दिसतोय…आधी लगीन कोंढाण्याचे म्हणणारा…त्याचाच वारसा चालवायचाय आम्हाला…अरे व्वा! कोसळला तो दुष्ट…कित्ती निष्पापांचे प्राण घेतले त्याने…किती जणांना अनाथ केलं…किती जण तडफडताहेत जखमी होऊन…आता भोग म्हणावं आपल्या कर्माचं फळ…
अरे पण इथे अशी गर्दी का करताहेत हे बघे लोक…ही काय लुटुपुटीची लढाई आहे काय सिनेमातील शूटिंगची? हा संगर आहे जीवावर उदार होऊन केलेला…तुमचेच प्राण वाचवण्यासाठी आलेत ना हे कमांडो…आणि तुम्ही…
कोण कुठले ते कमांडो
आलेत धावुनी तेही…
असं म्हणत…
बघताय मिटक्या मारत
करतांना ते कारवाई
व्हा दूर व्हा…बसा आपल्या घरट्यात जाऊन सुरक्षित…करू द्या आम्हाला आमचं काम विना व्यत्यय…
आवरा आपल्या मनातील मोकाटपणे फिरणारी बेछुट, बेधुंदपणाची लहर…
आई गं…वैऱ्याने दावा साधला वाटतं छातीवर नेम धरून…नाही…नाही…एवढ्यातच? कोणीतरी माझं ते पलिकडे पडलेलं पिस्तूल…पण…जयहिंद…जय भारतमाता…मनात उमटतेय कर्तव्यपूर्तीच्या बेधुंदपणाची एकच लहर…
३१डिसेंबर २००८ ची रात्र…(स्वर्गातुन)
गतवर्षाची ताजी रक्तरंजित घटना…जागोजागी उमटलेल्या गोळीबाराच्या खुणांची मन विदीर्ण करणारी नक्षी…कर्तव्यापोटी शहीद झालेल्या पोलीस अधिकारी, जवानांच्या चितेची अद्यापही गरम असलेली राख…त्यांच्या कुटुंबीयांच्या डोळ्यातील न सुकलेले अश्रू…
आणि हे सारं सारं विसरून…दरवर्षीप्रमाणे च नववर्षाच्या स्वागतासाठी उत्साहाने, हर्षोल्हासाने जल्लोष करणारा हा जनसमुदाय…
गतवर्षी जे घडुन गेले ते
विसरून गेले क्षणभर
नववर्षाच्या स्वागतास्तव
झाले तुम्हीं, झणी तत्पर
एवढे कसे कृतघ्न झालात…एवढ्या कशा गोठून गेल्यात संवेदना…कबुल आहे…
हकनाक तेव्हां जे मेले
ते नव्हते तुमचे कोणी
कां आठवुनी मग त्यांना
तुम्हांला यावी ग्लानी
पण परदुःख एवढं का शीतल असतं…मान्य आहे, काळाबरोबर पुढे पुढे चालायचंच असतं…पण त्या मार्गावर एखादा थांबा असावा समवेदनेचा, समानुभूतीचा…
ते दु:ख असे…
त्यांच्या पुरते फक्त
कर्तव्यच ते त्यांचे
कां मजेत आमच्या अंतर
असं म्हणण्याएवढं निलाजरं, निबर होऊ शकतं मन…केवळ
दोन मिनिटं श्रद्धांजली
वाहुन त्यांना मोकळं
शांती लाभो त्यांच्या आत्म्यांस
बोललात शब्द पोकळ
हा भाग असावा फक्त उपचाराचा? हृदयातून वाटणारा आदर, कृतज्ञता? अर्थात तुम्ही कसेही वागलात तरी आम्ही आमचे कर्तव्य करतच राहू, पण तरीही वाटतं…फक्त आत्ताच नाही, एरव्ही सुद्धा अशा संकटसमयी, दुःखद प्रसंगी कधीतरी लगाम खेचून रोखून धरावी आपल्या बेधुंद मनाची लहर…
भारती महाजन-रायबागकर