मालवण (मसुरे) :
कालावल खाडीपात्रात मसुरे टोकळवाडी जेटी नजीक पोहण्यासाठी खाडीपात्रात उतरलेल्या मुंबई येथील देवेन्द्र जनार्दन जाधव (४० वर्ष) यांचे पाण्यात बुडून निधन झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. दरम्यान जाधव यांच्या सोबत पाण्यात उतरलेल्या इतर चौघांनी पोहत किनारा गाठत आपला जीव वाचवण्यात यश मिळवले. मसुरे मार्गचितड येथील एका फार्म हाऊस वर हे सर्व जण थांबले होते. पाण्यात पोहण्यासाठी उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्याने देवेंद्र जाधव आपला जीव वाचवू शकला नाही. शवविच्छेदन मसुरे आरोग्य केंद्र येथें रात्री उशिरा करण्यात येणार आहे. रात्री ८ च्या सुमारास मृतदेह पाण्यात सापडला. मृतदेह शोधण्यासाठी बाबा सय्यद, इस्माईल सय्यद, कुणाल हडकर, रोहित नार्वेकर, राजू मुणगेकर आदींसह ग्रामस्थानी सहकार्य केले. पोलीस निरीक्षक श्री विजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली मसुरे पोलिस कॉन्स्टेबल पी. बी.नाईक, विवेक फरांदे अधिक तपास करत आहेत.