You are currently viewing गोडाऊन वर छापा पडल्यावर, वेंगुर्ला पोलीस “अँक्शन मोड”मध्ये

गोडाऊन वर छापा पडल्यावर, वेंगुर्ला पोलीस “अँक्शन मोड”मध्ये

*मातोंड घोडेमुख येथे पहाटे पकडली गोवा बनावटीची करमुक्त दारू*

 

वेंगुर्ले :

 

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर भरारी पथकाने काल होडावडा येथे छापा टाकून तब्बल 20 लाख रुपयांची अवैध दारू जप्त केली. या कारवाईनंतर वेंगुर्ले पोलिस “ॲक्शन मोडवर” आले असून त्यांनी आज पहाटे पेट्रोलिंग दरम्यान घोडेमुख येथे गोवा बनावटी दारूसह पाच लाखाचा मुद्देमाल जप्त केला असून एकाला ताब्यात घेतले आहे.

वेंगुर्ले तालुक्यातील घोडेमुख देवस्थानसमोरील, मळेवाड ते सावंतवाडी जाणारे रोडवर आज 15 जून रोजी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास वेंगुर्ले पोलिसांनी सापळा रचून मारूती सुझूकी कंपनीची स्वीप्ट कार मधून नेण्यात येणारे गोवा बनावटी दारूचे 54 बाॅक्स पकडले. यातील गाडी चालक सावंतवाडी तालुक्यातील किनळे खालचीवाडी येथील तुकाराम उर्फ आजो न्हानू नाईक यांच्यासह गाडी व दारुसह सुमारे 5 लाख 28 हजार 400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. आणि वेंगुर्ले पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारबंदी अधिनियम कलम 65(अ)(ई),81 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस कॉन्स्टेबल अमर विष्णु कांडर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की तुकाराम उर्फ आजो न्हानू नाईक हा आपल्या ताब्यातील मारूती सुझूकी कंपनीची स्वीप्ट चारचाकी गाडी नं GA 07 C 2655 मधून वरील किंमतीची गोवा बनावटीची दारू घेऊन जात होता. पेट्रोलिंग दरम्यान घोडेमुख मंदिर समोर रस्त्यावर त्या गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये गोवा बनावटी दारूचे बॉक्स आढळले. त्यामुळे त्यास मुद्देमालासह ताब्यात घेतले. या कारवाई मध्ये पोलीस अमर कांडर, पांडुरंग खडपकर, परशुराम सावंत, रूपाली सावंत, रमेश तावडे सहभागी होते. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा