*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच जनसंपर्क अधिकारी लेखक कवी विलास कुलकर्णी यांचा अप्रतिम लेख*
*जल व्यवस्थापन*
सार्वजनिक पाण्याच्या स्त्रोतांचे समाजातील सर्व स्तरांना योग्य असे वितरण याला जल व्यवस्थापन असे म्हणतात .भविष्यात जर तिसरे युद्ध झाले तर ते पाण्यासाठी होईल हे सत्य आहे . बावीस मार्च हा जागतिक जल दिन म्हणून साजरा केला जातो. पृथ्वीचा सत्तर टक्के भाग पाण्याने व्यापला आहे .पण तीन टक्के पाणीच पिण्या योग्य आहे . वाढते जल प्रदूषण , तापमान वाढ , अतिवृष्टी ,महापूर, उष्णतेच्या लाटा, ढग फुटी , दीर्घ दुष्काळ , बेमोसमी पाऊस , वाळवंटी करण असिड रेन बर्फ वृष्टी वणवे वादळे समुद्र पातळी वाढणे ह्या मुळे पाणी टंचाई जाणवू लागली आहे . आपण ह्यावर वेळीच उपाय योजना केली नाही तर भविष्यात तीव्र पाणी टंचाई जाणवेल
भारतात पाण्यासाठी नद्या व त्यावरील धरणे हे मुख्य स्त्रोत आहेत .बहुतेक शहरेही नद्यांच्या काठी वसलेली आहेत . ह्या धरणांमधील गाळाचा उपसा करणे जरुरीचे असते तो होत नाही .नद्याची वाळू चोरी होते त्यामुळे पाण्याचे होणारे झिरपने थांबते व जल स्तर खाली खाली जातो . जल प्रदूषण होण्याचे एक वेगळेच कारण जे कधीच चर्चिले जात नाही ते म्हणजे पाण्याची होणारी चोरी आणि गळती. जागेच्या कमतरतेमुळे पाण्याची वाहिनी व गटारची वाहिनी जवळ असेल व पाण्याच्या वाहीनीत गळती असेल तर दूषित गटारचे पाणी पिण्याच्या वाहीनीत जाऊन पिण्याचे पाणी दूषित करते. तसेच पाण्याची चोरी करताना पाणीचोर घाईत काम करताना गळती राहते. बऱ्याच ठिकाणी विशेषतः झोपडपट्ट्या चाळी येथे दूषित पाणी पुरवठा होऊन पेय जलाची कमतरता भासते . जल व्यवस्थापन करताना ह्या गोष्टींकडे दुर्लक्षच होताना दिसते .धरणांचा गाळ काढणे, रेती चोरी रोखणे,पाणी गळती व पाणी चोरी रोखली तर जल व्यवस्थापन खूप सोपे जाऊन पेय जलाची उपलब्धता वाढेल . मोठ्या शहरांतील पाणी गळतीचे आकडे पाहिले तर आपण अजूनही एकविसाव्या शतकात आहोत का याची खात्री वाटत नाही .कोल्हापूर येथील पाणी गळती सत्तर टक्के,दिल्लीची पंचेचाळीस टक्के,मुंबईची तीस टक्के हे आकडे वाचूनच आपण हैराण होतो. नगर पालिका,महानगर पालिका प्रशासन सुधारण्याची गरज आहे. सामान्य माणसा पर्यंत पोहचताना जर सत्तर टक्के पाणी गळती कोल्हापूर महानगर पालिका थांबवू शकत नसेल तर सामान्य माणसांनी थेंब थेंब पाणी वाचवून देखील असे कितीसे पाणी वाचेल .तिथेच सुधारणा होऊन गळती थांबली पाहिजे .
तसेच काही तांत्रिक कारणाने जर नगर पालिका दुरुस्ती साठी पाणी पुरवठा करू शकली नाही तर नगर पालिकेने स्वतः टँकर द्वारे पेय जल सशुल्क नागरिकांना पुरवावे जेणेकरून दूषित पाण्याचे टँकर नागरिकांना घ्यावे लागणार नाहीत . सामान्य नागरिक जेव्हढी बचत करायची ती करतोच पण जल नियोजन करताना पाण्याची मोठ्या प्रमाणावर होणारी गळती ह्या गोष्टींकडे समाजाचे व सरकारचे दुर्लक्ष होता कामा नये एवढीच माफक अपेक्षा.
विलास कुलकर्णी
मीरा रोड
7506848664