सावंतवाडी
मळगाव येथील ब्रिजच्याखाली रेल्वे ट्रॅकवर अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. सदर महिला 55 ते 60 वयाची असून रेल्वेला धडकून किंवा तिने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे.
महिलेच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला असून तिच्याजवळ पर्स सापडली आहे. त्यात दीड हजार रूपये आणि चिठ्ठी आढळली असून त्यावर मालाड-मुंबई अशा आशयाचा मजकूर लिहिला आहे. दरम्यान ही घटना सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. याबाबतची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस निरीक्षक शंकर कोरे घटनास्थळी दाखल झाले असून ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.
संबंधित महिलेच्या अंगावर हिरव्या रंगाची साडी आहे. तर तिचा चेहरा छिन्नविछिन्न झाला आहे. त्यामुळे तिची ओळख पटण्यात अडथळे येत आहे. संबंधित महिला कोणाच्या ओळखीची असल्यास किंवा कोणी बेपत्ता असल्यास सावंतवाडी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन शंकर कोरे यांनी केले आहे.