तहसील कार्यालयात धडक देत ग्रामस्थांनी मांडल्या संतप्त भावना
सावंतवाडी
कलंबिस्त ख्रिश्चनवाडी नजीक वाहणाऱ्या नदीतील गाळ काढण्याची तसेच संरक्षक भिंत उभारण्याच्या मागणीबाबत दहा वर्षांपासून कोणतीही कार्यवाही न करता येत्या पावसाळ्यात पुराच्या पार्श्वभूमीवर महसूल प्रशासनाने स्थलांतराच्या नोटिसा बजावल्याने कलंबिस्त ख्रिश्चनवाडीतील संतप्त रहिवाशांनी सोमवारी सकाळी सावंतवाडी तहसिल कार्यालय गाठून याचा जाब विचारला. पावसाळ्याच्या तोंडावर आम्ही जायचे कुठे? आणि या दिवसात आम्हाला निवारा कोण देणार? असा संतप्त सवाल तहसिलदार श्रीधर सावंत यांना केला.
कलंबिस्त ख्रिश्चनवाडीला गेल्या तीस वर्षापासून पुराचा फटका बसत आहे. दरम्यानच्या काळात पुराचे पाणी भरवस्तीत शिरून कोट्यवधींचे नुकसान झाले. मात्र नुकसानीचा पत्ताच नाही त्यामुळे या नदीतील गाळ काढावा तसेच पुरापासून ख्रिश्चनवाडीचे संरक्षण होण्यासाठी संरक्षक भिंत बांधण्याची ग्रामस्थांची अनेक वर्षांची मागणी आहे. मात्र याबाबत कोणतीही कार्यवाही न करता महसूल प्रशासनाने नोटिसा ग्रामस्थांना चक्क स्थलांतराच्या नोटिसा दिल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबत ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.
त्यामुळे ग्रामस्थांनी जिल्हा बँक संचालक महेश सारंग आणि माजी सभापती रवींद्र मडगावकर यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडी तहसील कार्यालयाला धडक देऊन स्थलांतराच्या नोटीस बाबत आणि प्रलंबित मागण्यांच्या प्रशासनाच्या उदासीन भूमिकेबाबत आपल्या संतप्त भावना मांडल्या. यावेळी महेश सारंग आणि रवींद्र मडगावकर यानीही या ग्रामस्थांना न्याय देण्याची मागणी केली. नदीपात्राची मंगळवारी पाहणीग्रामस्थांच्या संतप्त भावना लक्षात घेऊन यावेळी तहसिलदार श्रीधर सावंत यांनी मंगळवारी सकाळी कलंबिस्त ख्रिश्चनवाडी येथील नदी पात्राची पाहणी करून या नदीतील गाळ काढण्याबाबत तसेच पुरापासून ख्रिश्चनवाडीचे संरक्षण करण्यासाठी संरक्षक भिंत बांधण्याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.